Bharat Jadhav
अनेकदा चालताना, काही हालचाल करताना किंवा उभे राहिल्यावर पावलाच्या तळव्यामध्ये तीव्र वेदना होतात. हाडांच्या टोकांशी होणाऱ्या या वेदना अत्यंत तीव्र असू शकतात आणि त्यामुळे तुमच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. पावलाच्या तळव्यातील या वेदनांना बऱ्याचदा 'मेटाटार्सॅल्जिया' (metatarsalgia) म्हटलं जातं.
अयोग्य मापाचे बूट किंवा सँडल्स वापरल्याने तळव्यांमध्ये वेदना होऊ शकतात. जे लोक 'हाय हिल्स' (उंच टाचेचे बूट), पुढच्या बाजूला खूप अरुंद असलेले बूट किंवा कडक तळवे (सोल्स) असलेले बूट वापरतात, त्यांना पायांत आणि तळव्यांत वेदना होण्याची शक्यता अधिक असते.
धावणे, खेळ खेळणे किंवा नृत्य करणे यांसारख्या उच्च-तीव्रतेच्या शारीरिक हालचालींमुळे पावलांच्या तळव्यांमध्ये वेदना होऊ शकतात.
काही लोकांच्या पायांची रचना थोडी वेगळी असते. काहींचे तळवे सपाट असतात. तर काहींच्या पायांच्या कमानी (आर्च) उंच असतात. अशा व्यक्तींना पाय आणि तळव्यांमध्ये वेदना जाणवू शकतात.
जर बोटे विशेषत लांब असतील, तर ती बूटामध्ये पुढच्या बाजूला दुमडली जाऊ शकतात. अनेकदा, अंगठ्यावर होणाऱ्या दाबामुळे इतर बोटांवर आणि खुद्द पावलावरही अतिरिक्त ताण पडतो.
संधिवाताचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या पायांवर अनेकदा सूज येते. 'गाउट' (gout) आणि 'रुमॅटॉइड आर्थरायटिस' (rheumatoid arthritis) यांसारख्या आजारांमुळे पायात वेदना होऊ शकतात.
अतिरिक्त वजनामुळे पायांत वेदना होऊ शकतात. शरीराचे जास्तीचे वजन असल्यामुळे पाय उचलताना त्यावर अधिक ताण पडतो. वजन अचानक वाढल्यास पायांना त्या बदलाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
जर तुम्हाला पायांत आणि तळव्यांत तीव्र वेदना होत असतील, तर शारीरिक हालचाल करण्याऐवजी पायांना विश्रांती द्या. धावण्याऐवजी सायकलिंग करा किंवा २४ ते ४८ तास पूर्ण विश्रांती घ्या. दिवसातून २-३ वेळा, पायाच्या तळव्याच्या पुढच्या भागावर १० मिनिटांसाठी बर्फाचा शेक घ्या. सोफ्यावर बराच वेळ बसलेले असताना, तुमचे पाय उंचावर ठेवा.