Surabhi Jayashree Jagdish
झुरळं दिवसा कपाटाच्या फटी, सिंकखाली, गॅसच्या मागे किंवा इतर अंधाऱ्या जागांमध्ये लपून राहतात. अशा ठिकाणी त्यांना माणसांची हालचाल आणि इतर धोके टाळता येतात. त्यामुळे दिवसा घरात झुरळं कमी दिसतात.
झुरळं मुख्यतः रात्री एक्टिव्ह होणारे कीटक आहेत. रात्री घरातील प्रकाश आणि माणसांची वर्दळ कमी झाल्यावर त्यांची हालचाल वाढते. त्यामुळे शांत वातावरणात ती लपण्याच्या जागेतून बाहेर येतात.
रात्री झुरळं अन्नाचा शोध घेत घरभर फिरू शकतात. स्वयंपाकघरात पडलेले अन्नकण, तेलकट अवशेष किंवा उघडे ठेवलेले पदार्थ त्यांना आकर्षित करतात. रात्री उरलेलं अन्न तसंच ठेवलं असल्यास झुरळांना सहज खाद्य मिळतं.
अन्नासोबतच झुरळांना पाण्याचीही गरज असते. त्यामुळे ओला सिंक, गळणारा नळ, बाथरूममधील ओलसर भाग किंवा पाण्याचे थेंब असलेल्या जागांकडे ती जाऊ शकतात. घरातील ओलावा जास्त असेल तर अशा ठिकाणी झुरळांना अनुकूल वातावरण मिळते.
किचनमध्ये अन्नकण आणि बाथरूममध्ये ओलावा असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी झुरळं वारंवार आढळतात. विशेषतः सिंकखाली, ड्रेनजवळ त्यांना लपण्यासाठी जागा मिळते. या भागांची नियमित स्वच्छता आणि कोरडेपणा राखल्यास झुरळांना मिळणारे अन्न-पाणी कमी होतं.
कचरा वेळेवर न काढणं, अन्न उघडं ठेवणं आणि घरात ओलसरपणा राहणं यामुळे झुरळांना जगण्यासाठी आवश्यक संसाधनं मिळतात. अशा परिस्थितीत त्यांना लपण्यासाठी आणि अन्न-पाण्यासाठी अनेक जागा उपलब्ध होतात.
झुरळं दिवसा प्रामुख्याने लपून राहतात, त्यामुळे दिवसाच्या वेळी वारंवार दिसणं हे घरातील त्यांची संख्या वाढल्याचे संकेत असू शकते. अशावेळी किचन, सिंकखालील भाग, कपाटांच्या फटी आणि ड्रेनेजजवळील जागा तपासणं उपयुक्त ठरतं.