Surabhi Jayashree Jagdish
अश्वत्थामा हा आचार्य द्रोण आणि कृपी यांचा पुत्र होता आणि कौरवांच्या बाजूने कुरुक्षेत्राच्या युद्धात लढला. त्याच्याकडे अत्यंत प्रभावी दिव्यास्त्रांचं ज्ञान होतं आणि तो युद्धातील सामर्थ्यवान योद्ध्यांपैकी एक मानला जातो.
युद्ध संपल्यानंतर अश्वत्थामाने कृपाचार्य आणि कृतवर्मा यांच्यासह पांडवांच्या छावणीवर रात्री हल्ला केला. त्या वेळी त्याने झोपलेल्या द्रौपदीच्या पाच पुत्रांसह अनेक योद्ध्यांची हत्या केली. युद्धाच्या नियमांच्या दृष्टीने झोपलेल्या आणि असहाय व्यक्तींवर केलेला हा हल्ला अत्यंत अधर्माचे कृत्य मानले गेले.
या हत्याकांडानंतर पांडवांनी अश्वत्थामाचा पाठलाग केला आणि व्यासांच्या आश्रमाजवळ त्याला गाठलं. स्वतःचा बचाव करण्यासाठी अश्वत्थामाने ब्रह्मशिर अस्त्राचा प्रयोग केला तर अर्जुनानेही त्याला प्रत्युत्तर दिलं.
उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी आणि पांडवांचा वंश पुढे नेणाऱ्या परीक्षिताची आई होती. अश्वत्थामाच्या अस्त्रामुळे गर्भातील बालकाचा जीव गेला परंतु श्रीकृष्णांनी आपल्या सामर्थ्याने त्या बालकाला पुन्हा जीवन दिलं.
अश्वत्थामाने केलेल्या कृत्यांमुळे श्रीकृष्णांनी त्याला कठोर शिक्षा सुनावली. महाभारतातील वर्णनानुसार, त्याला तीन हजार वर्षे पृथ्वीवर एकट्याने भटकावं लागेल, माणसांच्या सहवासापासून दूर राहावं लागेल आणि त्याला विविध यातना सहन कराव्या लागतील.
महाभारतात श्रीकृष्णांचा शाप तीन हजार वर्षे पृथ्वीवर भटकण्याचा आहे तर नंतरच्या पुराणपरंपरांमध्ये अश्वत्थामाचा उल्लेख चिरंजीवींमध्ये केला जातो. त्यामुळे ‘अश्वत्थामा आजही जिवंत आहे’ ही धारणा मुख्यतः पुढील धार्मिक आणि लोकपरंपरांशी जोडलेली आहे.
अश्वत्थामाच्या शापाचा मुख्य संदर्भ महाभारतातील सौप्तिकपर्व आणि ऐषीकपर्व यामध्ये आढळतो, जिथे श्रीकृष्ण त्याला तीन हजार वर्षे पृथ्वीवर भटकण्याची शिक्षा सांगतात.