Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळा आला की आंब्याचा सुगंध आणि गोडवा सर्वांनाच आकर्षित करतो. मात्र आंबा खाण्यापूर्वी तो काही वेळ पाण्यात भिजवून ठेवण्याची जुनी पद्धत आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते. ही केवळ परंपरा नसून त्यामागे आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाची कारणं आहेत.
आंब्याच्या लागवडीदरम्यान तसंच वाहतुकीच्या प्रक्रियेत विविध कीटकनाशकं आणि रसायनांचा वापर केला जाऊ शकतो. आंबे 20 ते 30 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवल्यास त्यांच्या पृष्ठभागावरील काही अवशेष कमी होण्यास मदत होते.
आयुर्वेद आणि पारंपरिक मान्यतांनुसार, आंबा हे उष्ण प्रकृतीचं फळ आहे. आंबे पाण्यात भिजवल्याने त्यांचा उष्णतेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. त्यामुळे काही लोकांमध्ये पिंपल, अपचन किंवा शरीरातील उष्णता वाढल्यासारख्या समस्या कमी होऊ शकतात.
आंब्यामध्ये अल्प प्रमाणात फायटिक अॅसिड आढळतं. आंबे भिजवून ठेवल्यास त्याचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते आणि शरीराला पोषक घटकांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे करता येते.
आंब्याच्या देठाजवळून पांढरट, चिकट आणि लेटेक्ससारखा रस बाहेर पडू शकतो. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये हा रस घशात खवखव, खाज किंवा त्वचेची अॅलर्जी निर्माण करू शकतो. पाण्यात भिजवल्यामुळे हा चिकट रस निघून जाण्यास मदत होते.
आंबा पाण्यात भिजवल्यानंतर त्याच्या सालीवरील काही कडवटपणा कमी होऊ शकतो. यामुळे फळाची नैसर्गिक गोड चव अधिक खुलून येते. अनेकांना अशा प्रकारे भिजवलेला आंबा अधिक स्वादिष्ट वाटतो.
सर्वप्रथम एका स्वच्छ भांड्यात पुरेसं पाणी घ्या आणि त्यात आंबे पूर्णपणे बुडतील याची खात्री करा. आंबे सुमारे 20 ते 30 मिनिटं पाण्यात तसेच ठेवावेत. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन खाल्ल्यास अधिक सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने आंब्याचा आनंद घेता येतो.