Surabhi Jayashree Jagdish
द्रोणाचार्य हे महर्षी भरद्वाज यांचे पुत्र होते आणि त्यांना 'द्रोण' या नावानेही ओळखलं जायचं. त्यांनी भगवान परशुराम यांच्याकडून धनुर्विद्या, दिव्यास्त्रं आणि युद्धकलेचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या ज्ञान, पराक्रम आणि शस्त्रविद्येतील प्राविण्यामुळे त्यांना हस्तिनापूरच्या राजकुमारांचं राजगुरू म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
द्रोणाचार्य यांनी कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील सर्व राजपुत्रांना समान पद्धतीने युद्धकलेचं प्रशिक्षण दिलं होतं. त्यांनी अर्जुनाच्या विलक्षण प्रतिभेची ओळख पटवून त्याला जगातील सर्वोत्तम धनुर्धर बनवण्याची प्रतिज्ञा पूर्ण केली. इतकंच नाही तर भीम आणि दुर्योधनाला गदायुद्धात पारंगत केलं होतं.
भीष्म पितामह बाणशय्येवर गेल्यानंतर द्रोणाचार्य यांची कौरव सैन्याच्या सेनापतीपदी नियुक्ती करण्यात आली. सेनापती म्हणून त्यांनी अनेक प्रभावी युद्धरचना तयार केल्या. अभिमन्यूचा मृत्यू झालेल्या चक्रव्यूहाची रचना त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती.
द्रोणाचार्यांचा वध पांचालराज द्रुपद यांचा पुत्र धृष्टद्युम्न याने केला. तो पांडवांची पत्नी द्रोपदी हिचा भाऊ होता. श्रीकृष्णाच्या योजनेनुसार 'अश्वत्थामा मरण पावला' अशी बातमी द्रोणाचार्यांना सांगण्यात आली. ज्यामुळे त्यांनी शस्त्र खाली ठेवले. त्यानंतर ध्यानस्थ अवस्थेत असताना धृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद करून त्यांचा वध केला.
द्रोणाचार्यांचा मृत्यू कुरुक्षेत्र युद्धाच्या पंधराव्या दिवशी झाला. त्या दिवशी त्यांच्या पराक्रमामुळे पांडव सैन्याला मोठा धोका निर्माण झाला होता आणि त्यांना पराभूत करणं जवळपास अशक्य झालं होतं. त्यामुळे श्रीकृष्णाने आखलेल्या योजनेनुसार त्यांचं मनोधैर्य खच्ची करून त्यांचा अंत करण्यात आला.
द्रोणाचार्य आपल्या पुत्र अश्वत्थामावर अत्यंत प्रेम करत होते आणि त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी युद्ध करण्याची इच्छा सोडली. युधिष्ठिराने 'अश्वत्थामा हतः' असं सत्य आणि असत्य यांचा संगम असलेलं वाक्य उच्चारलं. कारण प्रत्यक्षात अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेला होता.
द्रोणाचार्य हे आदर्श गुरु, पराक्रमी योद्धा आणि कर्तव्यनिष्ठ सेनापती म्हणून महाभारतातील अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे कौरव सैन्याचं मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर युद्धाचा कल निर्णायकपणे पांडवांच्या बाजूने झुकू लागला.