Surabhi Jayashree Jagdish
कोकणची भूमी ही केवळ निसर्गसौंदर्यासाठी नाही तर तिच्या गूढ लोककथा, देव-दैवतांच्या श्रद्धांसाठीही ओळखली जाते. इथल्या प्रत्येक गावात एखादी वेगळी आख्यायिका, वेगळं दैवत आणि त्याच्याशी जोडलेली भीती-श्रद्धा आढळते.
अशाच गूढ लोकदेवतांपैकी एक म्हणजे शंकासूर. आजही अनेक कोकणी गावांमध्ये शंकासूराचं नाव आदराने आणि थोड्या भीतीने घेतलं जातं. या शंकासूरावर प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांची एक वेब सिरीज देखील येतेय.
शंकासूर हा कोकणातील लोककथांमधील एक गूढ रक्षक किंवा दैवी शक्ती मानली जाते. काही ठिकाणी त्याला लोकदेवता तर काही ठिकाणी अदृश्य रक्षक मानलं जातं. शंकासूर हा पूर्णपणे देवही नाही आणि राक्षसही नाही, तर गावाच्या सीमांचं रक्षण करणारी एक शक्ती अशी त्याची ओळख आहे.
लोककथांनुसार शंकासूर हा अन्यायाविरुद्ध उभा राहणारा पण नियम तोडणाऱ्यांना शिक्षा देणारा आहे. रात्री उशिरा चुकीचं वर्तन करणारे, चोरी करणारे किंवा गावाची मर्यादा ओलांडणारे लोक याला बळी पडतात, अशी समजूत आहे.
काही कोकणी गावांमध्ये शंकासूराला थेट मंदिर नसतं, पण विशिष्ट झाड, दगड किंवा ओसाड जागा त्याची मानली जाते. गावाबाहेरच्या सीमेवर नारळ, फुलं किंवा दिवा लावण्याची प्रथा काही ठिकाणी आजही आहे.
शंकासूराचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे तो कधीही प्रत्यक्ष दिसत नाही. लोककथांमध्ये फक्त आवाज, सावली किंवा अचानक येणारी भीती याचं वर्णन आढळतं. काहींच्या मते हा माणसाच्या मनातील भीतीचं प्रतीक आहे.
कोकणात रात्री उशिरा बाहेर फिरू नका, जंगलात एकटे जाऊ नका, असं सांगताना शंकासूराचं नाव घेतलं जातं. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत शिस्त आणि सावधपणा पाळला जातो.
होळीची रात्र ही गूढ मानली जाते. या रात्री वाईट शक्ती, अपशकुन वाढतं अशी समजूत आहे. शंकासूर हा अशा शक्तींवर नियंत्रण ठेवणारा रक्षक मानला जातो. त्यामुळे होळीच्या रात्री उगाच बाहेर फिरू नये, सीमा ओलांडू नये, असं सांगताना शंकासूराचं नाव घेतलं जातं.