Surabhi Jayashree Jagdish
गुगल ट्रान्सलेटला २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक रंजक माहिती समोर आलीये. गेल्या दोन दशकांत जगभरात सर्वाधिक वेळा ट्रान्सलेट झालेल्या शब्दाची माहिती दिलीये. गुगल इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केलीये.
गेल्या २० वर्षांत गुगल ट्रान्सलेटवर Thank You हा शब्द सर्वाधिक वेळा ट्रान्सलेट करण्यात आला आहे. गुगल इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर याबाबत माहिती दिली.
सामान्यतः प्रेम व्यक्त करणारे शब्द सर्वाधिक लोकप्रिय असतील असं मानलं जातं. मात्र Thank You या शब्दाने I Love You लाही मागे टाकल्याचे गुगलच्या आकडेवारीत दिसून आलंय.
Thank You हा शब्द जवळपास सर्व भाषांमध्ये आणि संस्कृतींमध्ये वापरला जातो. लोक हा शब्द आदर, आभार आणि सभ्य वर्तन दाखवण्यासाठी वापरतात. त्यामुळेच विविध देशांतील लोकांनी हा शब्द मोठ्या प्रमाणावर ट्रान्सलेट केला आहे.
गुगल ट्रान्सलेटची सुरुवात २००६ मध्ये झाली होती. सुरुवातीला ही सेवा मोजक्या भाषांपुरती मर्यादित होती. मात्र नंतर ती जगभर विस्तारीत केली. आज ही सेवा वेबसाइट, Android आणि iOS अशा सर्व प्रमुख प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
गुगलने ही माहिती शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. अनेक लोकांनी त्यांच्या मातृभाषेत Thank You कसं म्हणतात, हे कमेंट्समधून सांगितलं.
गुगल ट्रान्सलेटमुळे वेगवेगळ्या भाषांतील लोकांमध्ये संवाद साधणं अधिक सोपं झालं आहे. शिक्षण, व्यवसाय, पर्यटन आणि सोशल मीडिया यामध्ये या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.