Surabhi Jayashree Jagdish
आपण अन्नातून घेतलेल्या ग्लुकोजचा काही भाग लिव्हरमध्ये साठवला जातो. उपाशी राहिल्यावर शरीर आधी हा साठवलेला ग्लुकोज वापरते. बराच वेळ अन्न न मिळाल्यास शरीरातील ऊर्जा आणि प्रोटीनचा साठा कमी होऊ लागतो.
दीर्घकाळ उपाशी राहिल्यावर रक्तातील साखर योग्य पातळीवर ठेवण्यासाठी किडनीही मदत करते. त्यात पाणी कमी प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकतं. किडनीचा आधीपासून आजार असल्यास दीर्घकाळ उपाशी राहण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
शरीराला अन्नातून ऊर्जा मिळाली नाही तर ते आधी साठवलेली ऊर्जा वापरतं. त्यानंतर चरबीचा वापर केला जातो. खूप वेळ उपाशी राहिल्यावर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंचं प्रोटीन तोडू शकतं त्यामुळे हृदयाच्या स्नायूंवरही परिणाम होण्याचा धोका असतो.
मेंदूला काम करण्यासाठी मुख्यतः ग्लुकोजची गरज असते. बराच वेळ उपाशी राहिल्यावर शरीर चरबीपासून तयार होणाऱ्या केटोन बॉडीजचा पर्याय म्हणून वापर करू लागते. मात्र खूप वेळ अन्न न मिळाल्यास चक्कर, अशक्तपणा आणि एकाग्रता कमी होण्यासारख्या समस्या जाणवू शकतात.
बराच काळ पुरेसं अन्न न मिळाल्यास शरीराचं वजन आणि प्रोटीनचं प्रमाण कमी होऊ शकतं. उपासमारीचा परिणाम लिव्हर आणि आतड्यांसारख्या अवयवांवरही होऊ शकतो. त्यामुळे सतत किंवा खूप कडक उपवास करण्याऐवजी शरीराला पुरेसं पोषण मिळतंय याची काळजी घेणं गरजेचं आहे.
अन्न कमी मिळाल्यावर शरीर ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे इन्सुलिन आणि रक्तातील ग्लुकोजसह शरीरातील काही हार्मोन्समध्ये बदल होतात. बराच काळ कॅलरी आणि पोषक घटक कमी मिळाल्यास शरीराच्या सामान्य कामावर परिणाम होऊ शकतो.
दीर्घकाळ अन्न न घेतल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रोटीन पुरेसं मिळत नाहीत. त्यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. खूप दिवस उपाशी राहिल्यानंतर अचानक जास्त अन्न खाल्ल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्समध्ये धोकादायक बदल होऊ शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.