Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये ‘नवरात्रोत्सव’ हा अत्यंत पवित्र सण मानला जातो. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गाच्या नऊ वेगवेगळ्या शक्तीरूपांची पूजा केली जाते.
यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून नवरात्रोत्सवाला मंगलमय सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून उत्सवाला सुरूवात होते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप म्हणजेच माता शैलपुत्रीची पूजा केली जाते.
पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आल्यामुळे देवीला 'शैलपुत्री' हे नाव प्राप्त झाले आहे. माता शैलपुत्री ही धैर्य, पावनता आणि शक्तीचे प्रतीक मानली जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
शुभ मुहूर्तावर ईशान्य कोपऱ्यात किंवा पूजेच्या जागी पाटावर लाल वस्त्र अंथरून घटस्थापना करावी माता शैलपुत्रीच्या फोटो किंवा मूर्तीचे पूजन करावे.
माता शैलपुत्रीच्या पूजेमध्ये शुद्ध गायीचे साजूक तूप आणि तुपापासून बनवलेले गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत.
देवी शैलपुत्रीला लाल आणि पांढरी फुले अतिशय प्रिय आहेत. पूजेच्या वेळी माता शैलपुत्रीला पांढरी किंवा लाल रंगाची फुले अर्पण केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.