Surabhi Jayashree Jagdish
परशुराम ब्राह्मणांनाच शिष्य म्हणून स्वीकारत असत. कर्णाने स्वतःला ब्राह्मण असल्याचे सांगून त्यांच्याकडून शस्त्रविद्या शिकली. एकदा परशुराम त्यांच्या मांडीवर झोपले असताना कर्णाला किड्याने चावा घेतला, तरीही गुरुंची झोपमोड होऊ नये म्हणून त्याने वेदना सहन केल्या. ते पाहून परशुरामांना तो क्षत्रिय असल्याचे समजले आणि त्यांनी शाप दिला की, अत्यंत निर्णायक क्षणी त्याला ब्रह्मास्त्रासह दिव्य अस्त्रांचे मंत्र विसरतील.
एकदा सराव करताना कर्णाच्या बाणाने चुकून एका ब्राह्मणाची गाय मारली गेली. त्या ब्राह्मणाने दुःख आणि संतापातून कर्णाला शाप दिला की, ज्या प्रकारे त्याची निरपराध गाय असहाय्य अवस्थेत मारली गेली, त्याचप्रमाणे युद्धात कर्णही असहाय्य अवस्थेत मारला जाईल.
काही कथांनुसार कर्णाने चुकून एका गायीचा वध केल्यानंतर तिचं रक्त आणि तूप पृथ्वीवर सांडलं, त्यामुळे पृथ्वीदेवी रुष्ट झाल्या. त्यांनी शाप दिला की, निर्णायक वेळी पृथ्वी त्याच्या रथाचं चाक गिळून टाकेल.
हा शाप नसला तरी कर्णाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. इंद्राने ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे जन्मजात लाभलेले कवच आणि कुंडले दान म्हणून मागितलेआणि कर्णाने दानधर्म पाळत ती दिली.
युद्धात रथाचे चाक अडकल्यानंतर कर्णाने अर्जुनाला युद्ध थांबवण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीचा अपमान, अभिमन्यूचा अन्यायाने वध आणि इतर अधर्मांची आठवण करून देत अर्जुनाला युद्ध सुरू ठेवण्यास सांगितलं.
परशुरामांच्या शापामुळे कर्णाला निर्णायक वेळी दिव्य अस्त्रांचा मंत्र आठवला नाही. ब्राह्मणाच्या शापामुळे तो असहाय्य अवस्थेत शत्रूसमोर उभा राहिला, तर पृथ्वीशी संबंधित शापकथेनुसार रथाचे चाक जमिनीत अडकलं.
कर्णावरील शापांचं मुख्य वर्णन महाभारत मधील कर्णपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व यांमध्ये आढळतं. परशुरामांचा शाप आणि ब्राह्मणाच्या गायीचा प्रसंग हे महाभारताच्या प्राचीन आवृत्त्यांमध्ये स्पष्टपणे नमूद आहेत.