Surabhi Jayashree Jagdish
औरंगजेबाने जेव्हा पंढरपूरवर हल्ला केला, तेव्हा विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ती लपवण्यात आली होती.
१६९५ ते १६९९ या काळात औरंगजेबाची छावणी पंढरपूरजवळ, बेगमपुरामध्ये होती. त्यावेळी औरंगजेबाने देशभरातील अनेक मंदिरे पाडली होती, त्यामुळे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरालाही धोका निर्माण झाला होता.
या संकटकाळात, पंढरपूरच्या गोपाळ विठ्ठल बडव्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी विठोबाची मूर्ती देगावच्या सूर्याजी आणि जिवाजी पाटलांकडे सुपूर्द केली.
पाटलांनी ही पवित्र मूर्ती आपल्या शेतातील विहिरीत लपवली. एवढेच नाही, तर त्यांनी जवळपास चार वर्षे या मूर्तीचं रक्षणंही केलं.
या काळात, पाटलांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीतील पाणी उपसले नाही, जेणेकरून मूर्ती उघडकीस येऊ नये. काही काळानंतर धोका वाढल्यावर, मूर्तीला गवताच्या गंजीत काही दिवस लपवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
मुघल सरदारांकडून तपास अधिक कडक केल्यावर, सूर्याजी घाडगे पाटलांनी आपल्या वाड्याच्या तळघरात चोर कप्पा करून तिथे शेवटचं मूर्तीचे संरक्षण केलं.
१६९९ मध्ये औरंगजेबाची छावणी पंढरपूरमधून हलल्यानंतर, ११ ऑक्टोबर १६९९ रोजी बडव्यांनी सही करून मूर्तीची जबाबदारी परत घेतली आणि विठोबाची मूर्ती पुन्हा पंढरपूरच्या मंदिरात बसवण्यात आली. मराठ्यांचा इतिहास या ग्रंथांमध्ये या काळातील धार्मिक स्थळांवरील मुघलांच्या आक्रमणाचा आणि देवस्थानांच्या संरक्षणाचा उल्लेख असतो.