Sakshi Sunil Jadhav
हाय ब्लड प्रेशर असलेल्या अनेकांच्या मनात बीपीची गोळी सकाळी घ्यावी की रात्री, असा प्रश्न असतो. मात्र याचे उत्तर तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये दडलेले आहे.
न्यूयॉर्कस्थित हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लेविन यांच्या मते, गोळी कोणत्या वेळी घेतली यापेक्षा ती दररोज नियमितपणे घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
डॉ. लेविन रुग्णांना बीपीची गोळी रोज दात घासल्यानंतर किंवा रोजच्या एखाद्या ठराविक कामानंतर घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे डोस चुकण्याची शक्यता कमी होते.
पूर्वी काही अभ्यासांमध्ये रात्री औषध घेतल्याने फायदा होतो असे सांगितले जात होते. मात्र अलीकडील संशोधनात सकाळ किंवा रात्र, दोन्ही वेळा औषध घेणे तितकेच सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही औषधे, विशेषतः लघवीचे प्रमाण वाढवणारी (Diuretics) औषधे सकाळी घेणे अधिक योग्य मानले जाते. रात्री घेतल्यास वारंवार लघवीमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.
दिवसातून दोन-तीन वेळा औषध घ्यावे लागल्यास अनेक जण डोस विसरतात. शक्य असल्यास दिवसातून एकदाच घेण्याचे औषध अधिक सोयीचे ठरते.
डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेण्याची वेळ किंवा डोस बदलू नये. प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार औषधांचा परिणाम वेगळा असू शकतो.
औषधांचा डोस चुकल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळेपेक्षा नियमितपणे औषध घेण्याची सवय लावणे हेच हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
वरील माहिती विविध संशोधन आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. औषधांच्या वेळेत किंवा डोसमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.