Surabhi Jayashree Jagdish
माशाचा काटा गळ्यात अडकला तर घाबरून जाण्याची गरज नाही. पण योग्य उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं. अशावेळी घसा दुखणं, काहीतरी अडकल्यासारखं वाटणं किंवा गिळताना त्रास होऊ शकतो.
माशाचा काटा अडकला तर सर्वात आधी शांत राहणं खूप गरजेचं आहे. घाबरल्यामुळे घसा अधिक ताणला जातो आणि काटा आत जाऊ शकतो. नाकाने हळू श्वास घेत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता येते.
हलका काटा असेल तर जोरात खोकल्याने तो बाहेर येऊ शकतो. अनेकदा काटा घशाच्या मागच्या भागात अडकलेला असतो आणि खोकल्याने सुटतो. हा सर्वात सोपा आणि पहिला उपाय मानला जातो.
मोठा घास केळीचा घेऊन तो थोडा वेळ तोंडात ठेवा आणि नंतर गिळा. मऊ आणि चिकट पदार्थ काट्याला पकडून खाली ढकलण्यास मदत करतात. भाताचा गोळा किंवा पाण्यात भिजवलेला ब्रेडही उपयोगी पडतो.
कोमट मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास घशातील सूज आणि त्रास कमी होतो. जर काटा वरच्या भागात असेल तर तो सैल होण्यास मदत होऊ शकते. मात्र हा उपाय खोल अडकलेल्या काट्यासाठी उपयोगी नाही.
घशात बोट घालून काटा काढण्याचा प्रयत्न केल्यास तो अधिक आत जाऊ शकतो. त्यामुळे जखम होण्याची शक्यता वाढते. कठीण किंवा कोरडे अन्न जबरदस्तीने गिळणे टाळा.
जर १ दिवसानंतरही काटा निघाला नाही किंवा वेदना वाढल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. श्वास घेण्यास त्रास, रक्त येणं किंवा सूज वाढणं ही धोक्याची चिन्हे आहेत. अशावेळी उशीर न करता लगेच उपचार करा.