Cardiac arrest: हृदयाचे ठोके अचानक बंद पडल्यास पहिल्या काही मिनिटांत काय करावं?

Surabhi Jayashree Jagdish

आपत्कालीन परिस्थिती ओळखा

एखादी व्यक्ती अचानक खाली पडली आणि तिला शुद्ध राहिली नाही, तर ही गंभीर परिस्थिती असू शकते. अशा वेळी व्यक्तीला श्वास घेता येतोय का हे तपासा. व्यक्ती धापा टाकत असेल किंवा अधूनमधून श्वास घेत असल्यासारखी दिसत असेल, तरीही हृदय बंद पडल्याचं लक्षण असू शकतं.

CPR steps | saam tv

व्यक्ती शुद्धीत आहे का ते तपासा

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील अपघात आणि आपत्कालीन विभागाचे सल्लागार डॉ. संजय मेहता यांनी सांगितलं की, व्यक्तीच्या खांद्यावर हलकेच थाप मारा आणि मोठ्याने आवाज देऊन ती प्रतिसाद देते का ते पाहा. त्यानंतर तिला सामान्यपणे श्वास घेता येत आहे का हे काही सेकंदांत तपासा. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्ती नसाल तर नाडी तपासण्यात वेळ घालवू नका.

Sudden cardiac arrest | saam tv

तातडीने मदतीसाठी फोन करा

व्यक्ती प्रतिसाद देत नसेल आणि सामान्यपणे श्वास घेत नसेल, तर तातडीने मदत मागा. भारतात आपत्कालीन मदतीसाठी ११२ या क्रमांकावर फोन करा किंवा जवळच्या व्यक्तीला फोन करण्यास सांगा. तसेच परिसरात AED (ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर) हे उपकरण उपलब्ध असल्यास ते तातडीने आणण्यास सांगा.

CPR for adults | saam tv

तातडीने CPR सुरू करा

व्यक्तीला पाठीवर झोपवा आणि तिच्या खाली जमीन सपाट व कठीण असल्याची खात्री करा. दोन्ही हात एकमेकांवर ठेवून तळहाताचा खालचा भाग छातीच्या मध्यभागी ठेवा. त्यानंतर छातीवर दाब देण्यास सुरुवात करा, यालाच CPR (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) असं म्हणतात.

CPR depth | saam tv

CPR करताना योग्य पद्धत वापरा

प्रौढ व्यक्तीच्या छातीवर ५ ते ६ सेंटीमीटर खोल दाब द्या. एका मिनिटात १०० ते १२० वेळा छातीवर दाब देण्याचा वेग ठेवा. प्रत्येक दाबानंतर छाती पुन्हा पूर्ववत होऊ द्या आणि त्यानंतरच पुढचा दाब द्या.

AED usage | saam tv

तोंडावाटे श्वास द्या

तुम्हाला CPR चे योग्य प्रशिक्षण असेल तर छातीवर ३० वेळा दाब दिल्यानंतर दोन वेळा तोंडावाटे श्वास द्या. याला रेस्क्यू ब्रीदिंग असं म्हणतात. तुम्हाला हे प्रशिक्षण नसेल किंवा श्वास देणे शक्य नसेल, तर केवळ छातीवर दाब देत CPR सुरू ठेवा.

Emergency response | saam tv

AED उपकरणाचा वापर करा

AED उपकरण उपलब्ध असल्यास ते सुरू करा आणि त्यासोबत दिलेल्या सूचनांनुसार छातीवर पॅड लावा. त्यानंतर उपकरणातून येणाऱ्या आवाजातील सूचनांचं पालन करा. उपकरण हृदयाचे ठोके तपासत असताना किंवा विजेचा झटका देत असताना कोणीही रुग्णाला स्पर्श करू नये.

Breathing emergency | saam tv

वैद्यकीय मदत मिळेपर्यंत CPR सुरू ठेवा

रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत येईपर्यंत शक्य तितक्या कमी वेळासाठी थांबून CPR सुरू ठेवा. रुग्ण शुद्धीवर आला आणि सामान्यपणे श्वास घेऊ लागला, तर CPR थांबवा आणि त्याच्या श्वासावर लक्ष ठेवा. वैद्यकीय पथकाने मदत हाती घेईपर्यंत किंवा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या CPR करणं शक्य नसेपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवा.

saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Morning drink | saam tv
येथे क्लिक करा