ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पोपटी पार्टी म्हणजे हिवाळा सुरु झाल्यावर शेतीची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी थंडीपासून वाचण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी एक विरंगुळा म्हणून ही पार्टी करतात.
पोपटी पार्टीचे वैशिष्टे म्हणजे शेतात पिकणा-या हंगामी भाज्यांचा वापर करुन मेजवानी केली जाते.
पोपटी पार्टी ही पिढ्यान पिढ्या चालणारी कोकणी परंपरा आहे. कुटुंब, पाहुणे, मित्रमंडळी अशा सर्वांना बोलवून ही पार्टी आजही केली जाते.
पोपटी ही शाहकारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारात केली जाते. पोपटी मातीच्या भांड्यात म्हणजे मडक्यात शिजवण्याची पध्दत आहे.
वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, रताळी, बटाटी , कांदा, मका आणि वांगी इत्यादी पदार्थ एकत्र केले जातात. नंतर मडक्याच्या बुडात भांबुर्डिचा पाला टाकून त्यावर भाज्यांचे थर रचले जातात.
सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर मडक्याचे तोंड पाल्याने झाकून उलटे ठेवले जाते. यानंतर आजूबाजूला पेंढा, गवत आणि लाकडे लावून त्याची शेकोटी पेटवली जाते.
पोपटी शिजण्यास अंदाजे अर्धा पाऊण तास लागतो.पोपटी शिजल्यानंतर मडके बाजुला काढून पोपटी मोठ्या परातीत काढली जाते आणि त्याच्यावर प्रत्येकजण मस्त ताव मारतो.
आधुनिक भाषेत बोलायला गेले तर ही एक कॅम्प पद्धत आहे. गप्पा रंगतात, गाण्याच्या मैफिली रंगवल्या जातात आणि थंडीच्या हंगामात गरमागरम पोपटीचा स्वाद घेतला जातो.