Surabhi Jayashree Jagdish
जागतिक पर्यावरण दिन 2026 ची अधिकृत थीम "Climate Action" म्हणजेच हवामान बदलाविरुद्ध प्रभावी कृती अशी आहे. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि जंगलातील आगी यांसारख्या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधणं हा या थीमचा मुख्य उद्देश आहे.
पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला. पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर याबाबत लोकांना जागरूक करणं हा या दिवसाचा प्रमुख हेतू आहे.
1972 मध्ये पर्यावरणविषयक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद स्वीडनमधील स्टॉकहोममध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 1973 पासून हा दिवस दरवर्षी जगभरात विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जात आहे.
सध्या जगाला भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या पर्यावरणीय संकटांपैकी हवामान बदल हे एक प्रमुख संकट आहे. वाढणारे कार्बन उत्सर्जन पृथ्वीचे तापमान वाढवत असून त्याचा परिणाम शेती, जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर होत आहे. त्यामुळे 2026 ची थीम हवामान बदलाच्या परिणामांना रोखण्यासाठी तातडीच्या कृतीवर भर देते.
जागतिक पर्यावरण दिनामुळे पर्यावरण संरक्षण हा विषय केवळ वैज्ञानिक किंवा सरकारी स्तरावर मर्यादित राहत नाही. सामान्य नागरिकांनाही पर्यावरण संवर्धनात एक्टिव्ह सहभाग घेण्याची प्रेरणा मिळते. या दिवसामुळे शाश्वत विकास, हरित ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाबाबत जागतिक स्तरावर सकारात्मक चर्चा घडून येते.
या दिवशी वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आणि परिसंवाद आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी विभाग विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना सहभागी करून घेतात.
प्लास्टिकचा वापर कमी करणं, पाणी आणि वीज वाचवणं तसंच सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणं ही पर्यावरणासाठी महत्त्वाची पावलं आहेत. अधिकाधिक झाडं लावणं आणि जैवविविधतेचं संरक्षण करणं यामुळे हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास मदत होते.