Surabhi Jayashree Jagdish
आजच्या काळात रात्री उशिरापर्यंत जागरण करणं ही अनेकांची सवय झालीये. तरुण मुलं-मुली मोबाईल वापरण्यासाठी, सोशल मीडियावर वेळ घालवण्यासाठी किंवा ऑफिसचं काम पूर्ण करण्यासाठी झोप कमी घेतात.
झोप म्हणजे फक्त आराम करणं नाही तर शरीराला पुन्हा फ्रेश होण्यासाठी मिळणारा वेळ आहे. झोपेत शरीरातील पेशींची दुरुस्ती होते आणि मेंदू दिवसभरातील माहिती व्यवस्थित साठवण्याचं काम करतो. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मेंदूचं काम चांगलं राहसाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.
रात्री १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान झोपायला जाणं अनेक प्रौढांसाठी चांगली सवय ठरू शकते. या वेळेत झोपल्याने शरीराच्या नैसर्गिक बायोलॉजिकल घड्याळाशी झोपेची वेळ जुळवून घेण्यास मदत होते. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास आणि शांत झोप मिळण्यास मदत होऊ शकते.
गाढ झोपेत शरीराची दुरुस्ती आणि स्नायूंसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया सुरू असतात. या काळात मेंदू दिवसभरातील माहितीवर प्रक्रिया करतो आणि थकवा कमी होण्यास मदत होते. पुरेशी आणि चांगली झोप घेतल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता चांगली राहते.
रोज उशिरा झोपल्यामुळे झोपेचं शेड्यूल बिघडू शकतं आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवू शकतो. झोप कमी झाल्यास चिडचिड होणं, ताण वाढणं आणि कामात लक्ष न लागणं अशा समस्या जाणवू शकतात. दीर्घकाळ अपुरी झोप घेतल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हार्ट अटॅक यांसारख्या आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढण्याशी संबंधित आहे.
रात्री मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा जास्त वापर केल्याने झोप येण्यास उशीर होऊ शकतो. स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश शरीरात झोपेसाठी मदत करणाऱ्या मेलाटोनिन या हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम करू शकतो.
रोज ठराविक वेळी झोपणं आणि ठराविक वेळी उठणं यामुळे शरीराला नियमित दिनचर्येची सवय लागते. त्यासोबत संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं आणि मन शांत ठेवणं या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.