Surabhi Jayashree Jagdish
बाइक सुरू केल्यानंतर काहीजण ती काही सेकंदांतच बंद करतात. पार्किंगमधून बाइक काढताना किंवा काही कारणाने ही सवय अनेकांना असते. मात्र वारंवार असं केल्याने बाइकच्या इंजिनवर काय परिणाम होतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
इंजिन सुरू झाल्यानंतर त्यातील अनेक पार्ट्स वेगाने हलू लागतात. वारंवार इंजिन सुरू आणि बंद केल्याने ही प्रक्रिया पुन्हा होते. अधूनमधून असं केल्याने मोठा परिणाम होत नाही, पण सतत ही सवय ठेवणं टाळावं.
बाइक सुरू होताच इंजिन ऑइल विविध पार्ट्सपर्यंत पोहोचू लागतं. इंजिन बंद केल्यानंतर ऑइलचा प्रवाहही थांबतो आणि काही ऑइल पुन्हा खाली जमा होतं. वारंवार अगदी कमी वेळासाठी इंजिन चालवल्यास ऑइलला पूर्ण गरम होण्याची संधी मिळत नाही.
बाइक सुरू करताना इंजिनला पेट्रोलची गरज असते. थंड इंजिन सुरू करताना काही बाइक अधिक पेट्रोल वापरतात, जेणेकरून इंजिन सुरळीत चालू राहील. वारंवार बाइक सुरू आणि बंद केल्याने पेट्रोलचा वापर वाढू शकतो.
इंजिन सुरू होताना त्यातील पार्ट्सवर हालचालीचा सुरुवातीचा ताण येतो. इंजिन थंड असताना ऑइल तुलनेने घट्ट असतं आणि ते सर्व पार्ट्सपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागतो. वारंवार थंड इंजिन सुरू केल्याने दीर्घकाळात इंजिनच्या झिजेवर परिणाम होऊ शकतो.
बाइक सुरू केल्यानंतर साधारण ३० सेकंद ते एक मिनिट इंजिन स्थिर होऊ द्यावं. त्यानंतर बाइक हळू चालवावी आणि सुरुवातीला जोरात रेस देणं टाळावं. थंडीच्या वातावरणात किंवा बऱ्याच दिवसांनी बाइक सुरू केली असल्यास थोडा अधिक वेळ लागू शकतो.
गरज नसताना बाइक सुरू करून लगेच बंद करण्याची सवय टाळा. बाइक सुरू केल्यानंतर लगेच प्रवास करायचा नसेल, तर ती बंद ठेवणंच योग्य ठरतं. बाइकची योग्य काळजी घेतल्यास इंजिन दीर्घकाळ काम करतं.