Manasvi Choudhary
मुंबईसह संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊसाचा जोर वाढला आहे. वाढता पावसाचा जोर पाहता हवामान खात्याकडून रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट जारी केले जातात.
पण हे अलर्ट नेमके काय दर्शवतात? त्याचा अर्थ आणि महत्व समजून घेणे महत्वाचे आहे.
रेड अलर्ट हा हवामान खात्याचा सर्वात गंभीर इशारा आहे. याचा अर्थ असा की नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी, पूर, वादळ किंवा इतर संकटांच्या वेळी रेड अलर्ट जारी केला जातो.
रेड अलर्ट हा धोक्याची सर्वोच्च पातळी दर्शवतो आणि यामुळे जीवीतहानी किंवा मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने कारवाई आवश्यक असते.
ऑरेंज अलर्ट हा रेड अलर्टच्या तुलनेत कमी धोकादायक असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या काळात वीजपुरवठा खंडीत होणे, रस्ते वाहतूक ठप्प होणे किंवा इतर अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.
यलो अलर्ट हा हवामानातील बदलांमुळे येणाऱ्या संकटांचा अंदाज देण्यासाठी जारी केला जातो यामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळे येऊ शकतात जसे की वाहतूक कोंडी किंवा शाळा कॉलेजांना सुट्टी. यलो अलर्टचा अर्थ असा की नागरिकांनी सावध राहावे आणि हवामानाच्या बदलांवर लक्ष ठेवावे.
ग्रीन अलर्ट हा सर्वात सकारात्मक इशारा आहे. याचा अर्थ असा की हवामानाच्या दृष्टीने कोणताही धोका नाही आणि सर्व काही सुरळीत आहे. या काळात नागरिकांना कोणत्याही संकटाची भिती नसते. पावसाळ्यात हवामान अलर्ट समजून घेऊन त्यानुसार कृती करणे महत्वाचे आहे.