Surabhi Jayashree Jagdish
पांढरा तांदूळ हा मुख्यतः कार्बोहायड्रेटचा स्रोत असून त्यात थोड्या प्रमाणात प्रोटीन आणि काही सूक्ष्म पोषक घटक असतात. भात बंद केल्यानंतर हे पोषक घटक इतर पदार्थांमधून मिळवणं आवश्यक असतं.
पांढऱ्या भातातील कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपयोगी पडतात. ३० दिवस भात पूर्णपणे बंद केल्यास आहारातील एक महत्त्वाचा कार्बोहायड्रेट स्रोत कमी होतो. त्याची जागा पोळी, ज्वारी-बाजरीची भाकरी, ओट्स, दलिया किंवा इतर संपूर्ण धान्यांनी घेतली नाही तर काही जणांना थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
भात बंद केल्यामुळे आपोआप वजन कमी होतं असं नाही. कारण वजनावर संपूर्ण आहारातील कॅलरी, शारीरिक हालचाल आणि इतर अनेक घटकांचा परिणाम होतो. मात्र भातासोबत जास्त प्रमाणात खाल्लं जाणारे तूप, तेल, तळलेले पदार्थ किंवा मोठ्या प्रमाणातील एकूण कॅलरी कमी झाल्यास वजन घटू शकतं.
भात बंद करून त्याऐवजी भाज्या, डाळी, कडधान्यं आणि संपूर्ण धान्यांचा समावेश केल्यास आहार अधिक संतुलित होऊ शकतो. मात्र भाताच्या जागी सतत मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा जास्त कॅलरी असलेले अन्न घेतल्यास वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.
पांढऱ्या तांदळात फायबरचं प्रमाण कमी असल्याने तो पचनासाठी फायबरचा प्रमुख स्रोत मानला जात नाही. त्यामुळे भात बंद केल्यानंतर आहारात फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्ये वाढवल्यास फायबरचे प्रमाण उलट वाढू शकते.
भाताच्या जागी अचानक मोठ्या प्रमाणात कडधान्ये, राजमा, चणे किंवा इतर उच्च फायबरयुक्त पदार्थ सुरू केल्यास सुरुवातीला गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. शरीराला फायबरच्या गरजेशी जुळवून घेण्यासाठी आहारात बदल हळूहळू करा.
पांढरा भात हा संतुलित आहाराचा एक भाग असू शकतो आणि तो पूर्णपणे बंद करणं प्रत्येकासाठी आवश्यक नाही. किती भात खायचा हे व्यक्तीची ऊर्जा गरज, शारीरिक हालचाल आणि संपूर्ण आहार यावर ठरतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.