Surabhi Jayashree Jagdish
एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली किंवा शरीरात काही त्रास जाणवू लागला तर डॉक्टर एक्स-रे, सीटी स्कॅन किंवा एमआरआय करण्यास सांगू शकतात. काही वेळा केवळ एक्स-रे केल्याने आजार किंवा दुखापतीचे कारण समजतं तर काही वेळा सीटी स्कॅन किंवा एमआरआयची गरज भासते.
एक्स-रे ही शरीराच्या आतील भागांची इमेज तयार करणारी तपासणी आहे. यामध्ये क्ष-किरण म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शरीरातून सोडले जातात आणि त्यातून शरीराच्या आतील भागांची इमेज तयार होते. हाडांना फ्रॅक्चर झालं आहे का किंवा फुफ्फुसांमध्ये काही समस्या आहे का हे तपासण्यासाठी एक्स-रेचा वापर केला जातो.
एक्स-रे काढण्याची प्रक्रिया अतिशय जलद असते आणि इतर अनेक तपासण्यांच्या तुलनेत तिचा खर्चही कमी असतो. स्नायू आणि शरीरातील इतर सॉफ्ट टिश्यूजची स्पष्ट इमेज एक्स-रेमध्ये दिसत नाही. या तपासणीत शरीराला कमी प्रमाणात रेडिएशनचा संपर्क येतो. त्यामुळे गरजेनुसार आणि योग्य काळजी घेऊन ही तपासणी केली जाते.
सीटी स्कॅन म्हणजेच कॉम्प्युटेड टोमोग्राफी ही एक्स-रेपेक्षा अधिक सविस्तर माहिती देणारी तपासणी आहे. यामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या कोनांतून अनेक एक्स-रे इमेज घेतल्या जातात आणि कॉम्पुटरच्या मदतीने त्यांचं एकत्रित इमेज तयार केली जाते. या तपासणीमुळे हाडं, स्नायू, रक्तवाहिन्या आणि शरीरातील विविध अवयवांची रचना अधिक स्पष्टपणे पाहता येतात.
सीटी स्कॅनची प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होते आणि शरीराच्या आतील भागांची सविस्तर माहिती मिळते. अपघातानंतर शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला आहे का, ट्यूमर आहे का किंवा काही प्रकारचा संसर्ग आहे का, हे शोधण्यासाठी या तपासणीचा उपयोग होतो.
एमआरआय म्हणजेच मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ही शरीराच्या आतील भागांचं स्पष्ट चित्र तयार करणारी एडवान्स टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ लहरींचा वापर करून शरीरातील अवयवांची इमेज तयार केली जाते.
मेंदू, मणका, हृदय आणि सांध्यांशी संबंधित समस्यांचं निदान करण्यासाठी एमआरआयचा उपयोग केला जातो. एक्स-रे किंवा सीटी स्कॅनमधून एखाद्या समस्येची पुरेशी माहिती मिळत नसेल, तर एमआरआयमुळे त्या भागाची अधिक सविस्तर तपासणी करता येते.