Surabhi Jayashree Jagdish
गव्हाची चपाती हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र सलग 15 दिवस गव्हाची चपाती बंद केली तर शरीरात काही सकारात्मक तर काही नकारात्मक बदल दिसू शकतात. हे बदल कोणते आहेत ते पाहूयात.
गव्हाची चपाती शरीराला ऊर्जा देणाऱ्या कार्बोहायड्रेटचा मोठा स्रोत असतो. 15 दिवस चपाती बंद केल्यास शरीराला मिळणाऱ्या कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे काही लोकांना सुरुवातीला थकवा, कमजोरी किंवा आळस जाणवू शकतो.
गव्हातील कॅलरी आणि कार्बोहायड्रेट कमी झाल्यामुळे काही लोकांचं वजन कमी होऊ शकतं. विशेषतः जर चपातीऐवजी हलका आणि संतुलित आहार घेतला तर शरीरातील अतिरिक्त पाणी आणि चरबी कमी होण्यास मदत होतं.
गव्हामध्ये फायबर असतं जे पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतं. चपाती अचानक बंद केल्यास काही लोकांना बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होण्याची समस्या जाणवू शकते.
गव्हाचे पदार्थ कमी केल्याने काही लोकांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. विशेषतः जर त्याऐवजी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ले तर फायदा होऊ शकतो.
गव्हामध्ये फायबर, बी जीवनसत्त्वं आणि काही प्रमाणात लोह आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं असतात. चपाती बंद करून योग्य पर्याय न घेतल्यास शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा ओट्ससारखे पर्याय आहारात घेणं महत्त्वाचं ठरतं.
दररोज चपाती खाण्याची सवय असल्यामुळे अचानक ती बंद केल्यावर भूक लवकर लागणं किंवा काहीतरी अपूर्ण खाल्ल्यासारखं वाटू शकतं. काही लोकांना सुरुवातीला चिडचिड किंवा खाण्याची इच्छा वाढल्यासारखं जाणवतं.