Surabhi Jayashree Jagdish
कारच्या आत ओलावा साचल्यास बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे कारच्या आतील भागातून कुबट वास येऊ लागतो. पावसाचे पाणी कारमध्ये शिरल्यास किंवा ओले मॅट्स बराच वेळ तसेच राहिल्यास ही समस्या जाणवू शकते.
कारच्या एसी फिल्टरमध्ये हळूहळू धूळ आणि इतर बारीक कण जमा होतात. फिल्टरमध्ये घाण साचल्यास एसी सुरू केल्यानंतर कारमध्ये खराब वास पसरू शकतो. त्यामुळे एसी फिल्टरची वेळोवेळी तपासणी करून गरजेनुसार तो स्वच्छ करणे किंवा बदलणे आवश्यक आहे.
कारमध्ये प्रवास करताना अनेक जण खाद्यपदार्थ खातात किंवा पेये पितात. अन्नाचे कण सीटच्या खाली पडल्यास किंवा पेये कारच्या फरशीवर सांडल्यास त्यातून दुर्गंधी येऊ शकते. हे पदार्थ बराच वेळ कारमध्ये राहिल्यास वास अधिक जाणवू लागतो.
कारच्या सीट कव्हरवर आणि कार्पेटवर धूळ, माती तसेच इतर घाण जमा होत असते. या घाणीत ओलावा मिसळल्यास कारमध्ये कुबट वास येऊ शकतो. त्यामुळे सीट कव्हर आणि कार्पेट नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे.
कधी कधी उंदीर किंवा इतर लहान प्राणी कारच्या आत किंवा इंजिनच्या आसपास अडकू शकतात. असा प्राणी मृत झाल्यास त्याच्या शरीराचे विघटन सुरू झाल्यामुळे तीव्र दुर्गंधी येऊ शकते. असा वास जाणवत असल्यास कारच्या सीटखालील भागासह इंजिनच्या आसपासची जागाही तपासून घ्यावी.
कारची नियमित स्वच्छता न केल्यास धूळ, कचरा आणि अन्नाचे उरलेले कण आत साचत राहतात. यामुळे कारच्या आतील भागात दुर्गंधी निर्माण होऊ शकते.
कारमध्ये अचानक दुर्गंधी जाणवली तर ती नेमकी कुठून येते, हे शोधणं महत्त्वाचं आहे. कारमधील मॅट्स, सीटखालील जागा आणि एसीमधून येणाऱ्या हवेचा वास तपासल्यास कारण शोधण्यास मदत होते.