Surabhi Jayashree Jagdish
कोळी चावल्यानंतर चावलेल्या ठिकाणी लालसरपणा, खाज, वेदना किंवा हलकी सूज दिसू शकते. काही जणांच्या त्वचेवर लहान डाग किंवा फोडही येऊ शकतात. ही लक्षणं बहुतेक वेळा सौम्य असतात, मात्र ती वाढत असल्यास दुर्लक्ष करू नये.
कोळी चावलेल्या जागेला स्वच्छ पाणी आणि सौम्य साबणाने नीट धुवावं. यामुळे त्वचेवरील घाण आणि जंतू दूर होऊन संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते. जखम स्वच्छ आणि कोरडी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
चावलेल्या भागावर स्वच्छ कापडात बर्फ गुंडाळून 10 ते 15 मिनिटं हलका शेक द्यावा. बर्फ कधीही थेट त्वचेवर ठेवू नये, कारण त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते.
चावलेल्या जागेवर वारंवार खाजवू नये. कारण त्यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. कोणतंही घरगुती उपाय किंवा मलम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावू नयेत. घाबरून स्वतःच औषधोपचार करण्याऐवजी योग्य वैद्यकीय सल्ला घेणं अधिक सुरक्षित आहे.
कोळी चावल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं, चेहरा, ओठ किंवा घशाला सूज येणं ही गंभीर लक्षणं आहेत. तसंच तीव्र ताप, थंडी वाजणं किंवा संपूर्ण शरीरावर पुरळ उठल्यास तातडीने रुग्णालयात जावं.
बहुतांश कोळ्यांचं चावं जीवघेणे नसतात आणि योग्य काळजी घेतल्यास काही दिवसांत बरे होतात. तरीही प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रतिक्रिया वेगळी असू शकते. त्यामुळे लक्षणं वाढत असतील किंवा असामान्य वाटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
डॉ. जेम्स ओ'डोनोवन जे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) तांत्रिक सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत, त्यांच्या मते कोळी चावल्यानंतर योग्य प्रथमोपचार करणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांनी जखम स्वच्छ धुणं, बर्फाचा अप्रत्यक्ष शेक देणं आणि खाजवणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.