Shreya Maskar
मूग डाळ पालक चिला बनवण्यासाठी मूग डाळ, दही , पालक, कोथिंबीर, हिरवी मिरच्या, आले, जिरे, हळद, लाल मिरची पूड, लिंबाचा रस , मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
मूग डाळ पालक चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग धुवून चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर पाणी काढून मिक्सरमध्ये पेस्ट बनवा. पिठाचा घट्टपणा डोशाच्या पिठासारखा असावा.
तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला पालक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून एकजीव करा.
त्यानंतर मिश्रणात आले, जिरे, हळद, लाल मिरची पूड, लिंबाचा रस घालून सर्व छान एकजीव करा. पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. चवीनुसार मीठ घाला.
आता नॉनस्टिक पॅन गरम करून त्यात थेंबभर तेल घाला आणि चमचाभर डाळीचे मिश्रण गोल पसरवून घ्या. चिला दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. शेवटी तयार मूग डाळ पालक चिला दह्यासोबत खा. तु्म्ही थोडेसे दही चिला बनवताना त्या मिश्रणात देखील टाकू शकता.
वजन कमी करण्यासाठी पालक अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. तसेच यात तंतूमय पदार्थ (फायबर) व पाण्याचे प्रमाण भरपूर असते.
मुगाची डाळ हा वजन कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट आहारपदार्थ आहे. यात कमी कॅलरीज असतात. तसेच प्रथिने आणि फायबर असतात, ज्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते.
दही पोट भरल्याची भावना निर्माण करून, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवून आणि चयापचय क्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करते.