Shreya Maskar
चपाती-भाजी खाऊनही वजन कमी होऊ शकते, पण त्यासाठी प्रमाण आणि चपातीचा प्रकार योग्य असणे आवश्यक आहे. चपातीमध्ये भाताच्या तुलनेत जास्त फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
मेथीमध्ये लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे (A, C, K) भरपूर असतात. उच्च फायबर, चयापचय वाढवणाऱ्या गुणधर्मांमुळे वजन कमी करण्यास मदत होते. भूक नियंत्रित होते आणि पचन सुधारते.
मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथीच्या पानांची जुडी, तेल, लसूण, जिरे, हिरव्या मिरच्या, कांदा, हळद, ओले खोबरे, मीठ इत्यादी साहित्य लागते.
मेथीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून चांगली फोडणी द्या. गॅस कमी आचेवर ठेवा.
आता यात चिरलेला कांदा घाला. चिरलेली मेथीची पाने आणि हळद घाला. भाजी मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवा, जेणेकरून भाजीचे प्रमाण थोडे कमी होईल.
भाजी पाने मऊ झाल्यावर झाकण काढा आणि भाजीतील अतिरिक्त पाणी आटण्यासाठी १ मिनिटभर मोठ्या आचेवर शिजवा. मेथीच्या पानांत पाण्याचा अंश असतो, त्यामुळे जास्तीचे पाणी टाकू नका.
भाजीवर वरून किसलेले ओले खोबरे घाला. त्यानंतर गरमागरम चपातीसोबत मेथीची भाजीचा आस्वाद घ्या.
वजन कमी करण्यासाठी भाजीत बटाटा टाकू नका. लसूण भरपूर प्रमाणात वापरा, कारण त्यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते.