Surabhi Jayashree Jagdish
उपग्रहांमधून पृथ्वीवरील ढगांचे सतत फोटो आणि व्हिडिओ मिळतात. या फोटोंच्या आधारे ढगांची हालचाल, उंची आणि त्यांचा वेग समजतो. त्यामुळे पाऊस किंवा वादळ कोणत्या दिशेने सरकत आहे, याचा अंदाज लावणं सोपं होतं.
डॉपलर रडारच्या साहाय्याने ढगांमधील आर्द्रतेचं प्रमाण मोजलं जातं. तसंच पावसाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेगही यामधून समजतो. त्यामुळे मुसळधार पाऊस किंवा वादळाचा इशारा वेळेवर देता येतो.
रेडिओसॉन्ड नावाचं उपकरण फुग्याद्वारे वातावरणाच्या वरच्या थरात सोडलं जातं. ते तापमान, आर्द्रता आणि हवेचा दाब यांची माहिती नोंदवतं. याशिवाय जगभरातील हवामान केंद्रांमधून तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग याचा रिअल-टाइम डेटा गोळा केला जातो.
बॅरोमीटरच्या मदतीने वातावरणातील हवेचा दाब मोजला जातो. हवेचा दाब कमी होत असल्यास वादळ किंवा खराब हवामान येण्याची शक्यता वाढते. अॅनेमोमीटरच्या साहाय्याने वाऱ्याचा वेग मोजून हवामानातील बदलांचा अंदाज घेतला जातो.
समुद्रात बसवलेल्या ओशन बॉईजद्वारे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान आणि लाटांची माहिती गोळा केली जाते. ही माहिती विशेषतः मान्सूनचा अंदाज बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. समुद्रातील बदलांचा थेट परिणाम पाऊस आणि हवामानावर होत असल्याने त्यांचा अभ्यास केला जातो.
जगभरातून गोळा झालेला सर्व डेटा कॉम्प्युटरमधून तपासला केला जातो. गणिती सूत्रांच्या मदतीने पुढील काही तास, दिवस किंवा आठवड्यांचं हवामानाचं मॉडेल तयार केलं जातं. त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनतो.
शास्त्रज्ञ सध्याच्या हवामानाची तुलना पूर्वीच्या अशाच हवामानाच्या नमुन्यांशी करतात. आधुनिक उपकरणं, ऐतिहासिक माहिती आणि कॉम्प्युटरद्वारे तपासला जातो. यांचा एकत्रित वापर करून अंतिम हवामानाचा अंदाज जाहीर केला जातो.