Shruti Vilas Kadam
व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी १ कप फ्लॉवर, १ बटाटा, १ गाजर, अर्धा कप फरसबी, अर्धा कप मटार, २ टोमॅटो, २ कांदे, आलं-लसूण पेस्ट, तेल, मीठ आणि लाल तिखट घ्या.
फ्लॉवर, बटाटा, गाजर, फरसबी आणि मटार स्वच्छ धुऊन चिरून घ्या. या भाज्या थोडे मीठ घालून अर्धवट शिजवून घ्या. भाज्या पूर्ण मऊ होणार नाहीत, याची काळजी घ्या.
एका कढईत थोडे तेल गरम करून सुके खोबरे, तीळ, धणे, जिरे, लवंग, दालचिनी आणि लाल मिरच्या भाजून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परता. त्यानंतर चिरलेले टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.
कांदा-टोमॅटोच्या मिश्रणात तयार केलेला कोल्हापुरी मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व मिश्रण तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या. यामुळे भाजीला छान खमंग चव येईल.
आता मसाल्यात उकडलेल्या भाज्या घाला. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून भाजी मंद आचेवर ८ ते १० मिनिटे शिजवा. मसाला भाज्यांमध्ये व्यवस्थित मुरल्यानंतर गॅस बंद करा.
तयार भाजीवर कोथिंबीर घालून सजवा. गरमागरम व्हेज कोल्हापुरी चपाती, भाकरी, पराठा किंवा जिरा राइससोबत सर्व्ह करा. झणझणीत आणि मसालेदार चवीमुळे जेवणाची मजा आणखी वाढेल.