Shreya Maskar
यंदा 29 जून ला वटपौर्णिमा हा सण आला आहे. वटपौर्णिमेला बाजारात फणस येतात, त्यामुळे वटपौर्णिमेला खास फणसाच्या बियांचे वडे ही चटपटीत रेसिपी नक्कीच ट्राय करा.
फणसाच्या बियांचे ( फणसाच्या आठळ्या) वडे बनवण्यासाठी फणसाच्या आठळ्या, हरभरा डाळ, तांदळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, लसूण , हळद, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल इत्यादी साहित्य लागते.
फणसाच्या बियांचे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम बिया स्वच्छ धुवून कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या काढून मऊ उकडून घ्या. यामुळे बिया सोलायला आणि मॅश करायला सोपे पडेल.
उकडलेल्या बिया थंड झाल्यावर त्याची साल काढा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यानंतर फणसाच्या बियांचे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढा.
पुन्हा मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चणा डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे घालून थोडे पाणी टाकून जाडसर पेस्ट वाटून घ्या. तयार पेस्ट बियांच्या मिश्रणात मिक्स करा.
त्यानंतर मिश्रणात तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून एकजीव करून घ्या.
आता एक प्लास्टिक पेपर घ्या त्यावर थोडे तेल लावून छोटे छोटे वडे बनवा. आकार थोडा मोठा आणि पातळ ठेवा.
पॅनमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर फणसाचे वडे गोल्डन फ्राय करा. कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. चटपटीत शेंगदाण्याच्या चटणीसोबत वड्यांचा आस्वाद घ्या.