Surabhi Jayashree Jagdish
यकृताशी संबंधित अनेक समस्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं न दाखवता राहू शकतात. त्यामुळे फॅटी लिव्हर किंवा यकृताला झालेली इजा अनेकदा सहज लक्षात येत नाही. शरीरात जाणवणारे काही सूक्ष्म बदल मात्र यकृताच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकेत देऊ शकतात.
लघवीच्या रंगात बदल होणं हा यकृत किंवा पित्ताशी संबंधित समस्यांमध्ये दिसणारा एक संकेत असू शकतो. त्याचप्रमाणे शौचाच्या रंगातील बदल, त्वचेतील बदल आणि पचनसंस्थेशी संबंधित तक्रारींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. हे बदल सातत्याने जाणवत असतील तर त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणं योग्य आहे.
डिहायड्रेशनमुळे लघवीचा रंग गडद होऊ शकतो. मात्र, पुरेसं पाणी पिऊनही लघवी सतत गडद दिसत असेल तर ते यकृत किंवा पित्तवाहिन्यांशी संबंधित समस्येचे संकेत असू शकते. त्यासोबत शौचाचा रंग पांढरा, राखाडी किंवा मातीसारखा होऊ शकतो.
त्वचेवर मध्यभागी लाल ठिपका आणि त्याभोवती पसरलेल्या बारीक रक्तवाहिन्यांना ‘स्पायडर अँजिओमा’ म्हणतात. एक-दोन अशा खुणा असणे सामान्य असू शकते. मात्र चेहरा, खांदे किंवा छातीवर अशा अनेक खुणा अचानक दिसू लागल्या, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तळहातांवर लालसरपणा दिसण्याला ‘पाल्मर एरिथेमा’ म्हणतात. त्याचा संबंध काही वेळा यकृताच्या आजाराशी असू शकतो. मात्र गर्भधारणा, थायरॉईड आणि संधिवात यांसारख्या इतर कारणांमुळेही असं होऊ शकतं.
पूर्वीपेक्षा सहज जखम होणं किंवा कोणतंही स्पष्ट कारण नसताना रक्तस्राव होणं हे यकृताच्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली अनेक प्रोटीन तयार करतं. त्यामुळे यकृताचे कार्य बिघडल्यास या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.