Surabhi Jayashree Jagdish
अनेकांना वाटतं की, कमी खाल्ल्याने वजन लवकर कमी होईल, पण हे नेहमीच खरं नसतं. खूप कमी कॅलरी घेतल्यास शरीराचं मेटाबॉलिझम मंदावू शकतो आणि ऊर्जा कमी पडू शकते. यामुळे अशक्तपणा, थकवा आणि वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात.
वजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळणं ही एक मोठी चूक मानली जाते. सकाळचा नाश्ता न केल्यास दिवसभर भूक अधिक लागते आणि नंतर जास्त प्रमाणात खाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कॅलरीचं प्रमाण वाढून वजन कमी होण्यापेक्षा वाढू शकतं.
दीर्घकाळ काहीही न खलल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा वेळी जेवणात जास्त खाण्याची प्रवृत्ती वाढते आणि कॅलरीचं सेवन अनियंत्रित होतं. ही सवय वजन कमी करण्याच्या प्रवासात अडथळा निर्माण करू शकते.
प्रोटीन हे स्नायूंचं आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्त्व आहे. आहारात प्रोटीनची कमतरता असल्यास स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि शरीरातील चरबी कमी होण्याचा वेग घटू शकतो. त्यामुळे वजन कमी करताना प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.
कोल्ड ड्रिंक्स, पॅकबंद ज्यूस आणि इतर गोड पेयांमध्ये लपलेली साखर मोठ्या प्रमाणात असते. ही अतिरिक्त साखर शरीरात जास्त कॅलरी जमा करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे अशा पेयांचं नियमित सेवन वजन वाढण्याचा धोका वाढवू शकतं.
झोपेची कमतरता वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते. कमी झोपेमुळे तणावाशी संबंधित हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे भूक वाढू शकते. परिणामी वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकतं.
तळलेल्या आणि तेलकट पदार्थांमध्ये अतिरिक्त कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. या कॅलरीज शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवल्या जाऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना अशा पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणं अधिक फायदेशीर ठरतं.