Surabhi Jayashree Jagdish
मुसळधार पावसामुळे सापांची बिळं आणि लपण्याच्या जागा पाण्याने भरून जातात. त्यामुळे ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. अशा वेळी घर, गॅरेज, गोदाम किंवा शेड यांसारख्या कोरड्या जागांमध्ये ते आश्रय घेऊ शकतात.
पावसाळ्यात उंदीर, बेडूक आणि पाल यांसारखं सापांचं भक्ष्य घराजवळ किंवा घरात आश्रय घेतात. या प्राण्यांचा माग काढत सापही त्या परिसरात पोहोचतात. त्यामुळे घरात उंदरांची संख्या वाढल्यास साप येण्याची शक्यता देखील वाढू शकते.
सापांना शांत, अंधार आणि सुरक्षित जागा आवडते. पावसाळ्यात बाहेरील वातावरण सतत ओलं असल्याने ते घरातील कोपरे, लाकडाचे ढीग, स्टोअररूम किंवा न वापरलेल्या गोष्टींमध्ये लपून बसू शकतात.
पावसाळ्याच्या दिवसात घरी साप येऊ नये म्हणून घराच्या आजूबाजूला गवत, झुडपे आणि कचरा साचू देऊ नका. लाकूड, विटा किंवा पत्र्यांचे ढीग शक्यतो घरापासून दूर ठेवा. अशा स्वच्छ वातावरणामुळे सापांना लपण्यासाठी योग्य जागा मिळत नाही.
घरात किंवा परिसरात उंदरांची संख्या वाढू देऊ नका. अन्नपदार्थ झाकून ठेवा आणि कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावा. सापांचं भक्ष्य कमी असल्यास त्या भागात साप येण्याची शक्यता देखील कमी होते.
दरवाजाखालील मोकळी जागा, भिंतीतील भेगा आणि ड्रेनेजजवळील उघडी छिद्रं व्यवस्थित बंद करा. खिडक्यांना मजबूत जाळी बसवा. यामुळे सापांना घरात प्रवेश करण्याची संधी कमी मिळते.
घरात साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर राखून घरातील इतर लोकांना त्या जागेपासून दूर ठेवा. त्यानंतर स्थानिक वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्र यांच्याशी त्वरित संपर्क साधून सापाचे सुरक्षितपणे स्थलांतर करून घ्या.