Shreya Maskar
हिवाळ्यात थंडीत अनेक लोक रात्री झोपताना चादर, ब्लँकेटने संपूर्ण शरीर कव्हर करून झोपतात. तर कधीकधी थंड वातावरणामुळे चादर तोंडापर्यंत येते. मात्र याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
तज्ज्ञांच्या मते, झोपताना चेहरा झाकल्याने श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो. याचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. फुफ्फुसाच्या आजाराची समस्या निर्माण होऊ शकते.
तुम्ही तोंडावर आणि नाकावर चादर घेऊन झोपलात तर बाहेरची मोकळी हवा तुम्हाला मिळत नाही किंवा मर्यादित मिळते. बऱ्याचदा व्यक्ती आपण सोडलेला कार्बन डायऑक्साइड श्वास घेताना पुन्हा शरीरात घेतो. ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते.
कमी ऑक्सिजन आणि उच्च कार्बन डायऑक्साइड पातळीमुळे डोकेदुखी, चक्कर येणे, अस्वस्थता आणि निद्रानाश होऊ शकतो. तसेच सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.
चेहरा झाकल्याने उष्णता आणि ओलावा देखील अडकतो. यामुळे रात्री घाम येणे, वारंवार जागे होणे आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तोंडावर जास्त काळ चादर घेऊन झोपल्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येतो. चांगल्या झोपेसाठी शरीराचे संतुलित तापमान राखणे आवश्यक आहे.
दमा, सीओपीडी किंवा स्लीप एपनिया असलेल्या लोकांना या सवयीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आताच ही सवय बदला.
थंडीत उबदार राहण्यासाठी चेहरा झाकण्यापेक्षा शरीर झाकणे चांगले. उबदार कपडे घाला, ब्लँकेट खांद्यापर्यंत ओढा. तसेच पंखा बंद ठेवा. नैसर्गिक हवा खेळती ठेवा. ज्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास अधिक सोपे करेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.