Surabhi Jayashree Jagdish
रोजच्या इडल्यांनी कंटाळा आला असेल तर ज्वारीच्या पिठापासून मऊ आणि लुसलुशीत इडली तुम्ही बनवू शकता.
योग्य प्रमाणात साहित्य आणि काही खास टिप्स वापरल्या तर तुम्ही नक्कीच परफेक्ट इडली बनवू शकता.
ज्वारी - २ कप, उडीद डाळ - १ कप, पोहे - १/२ कप, मेथी दाणे - १ छोटा चमचा, मीठ - चवीनुसार, पाणी - गरजेनुसार
एका मोठ्या भांड्यात ज्वारी, उडीद डाळ आणि मेथी दाणे एकत्र करून २-३ वेळा स्वच्छ धुऊन घ्या. हे मिश्रण किमान ६ ते ८ तास किंवा रात्रभर पुरेसं पाणी घालून भिजत ठेवा. दुसऱ्या एका भांड्यात पोहे १० मिनिटे भिजत ठेवा.
भिजलेली ज्वारी, उडीद डाळ आणि मेथी दाणे मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्या. वाटताना गरजेनुसार थंड पाणी वापरा. पोहे जास्त वेळ भिजवलेले असल्याने ते आधीच मऊ झाले असतील. ते पिठासोबतच मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या.
पीठ काढलेल्या भांड्यावर झाकण ठेवून उबदार ठिकाणी ६ ते ८ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा. पीठ आंबल्यावर त्याचा आकार दुप्पट होतो. आंबलेलं पीठ हलक्या हाताने ढवळून घ्या. त्यात मीठ मिसळा.
इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा. इडलीच्या साच्याला थोडं तेल किंवा तूप लावून घ्या. आंबलेलं पीठ साच्यांमध्ये घाला. पाणी चांगलं उकळल्यावर इडलीचे साचे पात्रात ठेवा. झाकण लावून १० ते १२ मिनिटे इडली वाफवून घ्या.
इडली वाफवून झाल्यावर गॅस बंद करा. २-३ मिनिटे साचे तसेच राहू द्या. साचे बाहेर काढून चमचा किंवा चाकूच्या मदतीने इडल्या अलगद बाहेर काढा. गरमागरम मऊ आणि लुसलुशीत ज्वारीची इडली सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.