Shreya Maskar
दिवाळीच्या फराळामध्ये चकली, चिवडा, लाडू यांसोबतच कुरकुरीत आणि खमंग शेव असली की फराळाची मजा आणखी वाढते. बेसनापासून तयार होणारी ही शेव बनवायला सोपी असून चहा किंवा फराळासोबत खाण्यासाठी उत्तम आहे.
शेव बनवण्यासाठी बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, ओवा, मीठ, तेल, हिंग, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
शेव बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, ओवा, हिंग आणि मीठ एकत्र करा. मिश्रणात गरम तेल घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. यामुळे शेव कुरकुरीत होण्यास मदत होते.
थोडे थोडे पाणी घालून मऊसर, गुळगुळीत आणि शेवच्या साच्यातून सहज बाहेर येईल असे पीठ तयार करा. शेव बनवण्याच्या यंत्राला बारीक छिद्रांची चकती लावा आणि त्यामध्ये तयार पीठ भरा.
पॅनमध्ये तेल गरम करा. तेल मध्यम गरम असावे. तेल खूप गरम असल्यास शेव लवकर लाल होतात. गरम तेलात साच्याच्या मदतीने गोलाकार शेव सोडा. ती सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
शेव दोन्ही बाजूंनी तळून झाल्यावर झाऱ्याने बाहेर काढा आणि टिश्यू पेपरवर ठेवा. शेव पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ करू नका. पिठामध्ये गरम तेलाचे मोहन घातल्याने पोत चांगला येतो. शेव नेहमी मध्यम आचेवर तळा.
शेव तळताना कढईमध्ये एकावेळी खूप शेव घालू नका. शेव पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात ठेवा, अन्यथा ती मऊ पडू शकते.