Surabhi Jayashree Jagdish
लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असणे ही सामान्य गोष्ट आहे. अंगठा चोखल्याने काही मुलांना शांत वाटतं आणि झोपायलाही मदत होते. पण मुलाचं वय वाढल्यानंतरही ही सवय सुरू राहिली तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
अंगठा चोखण्याची सवय साधारण चार वर्षांच्या आसपास कमी होऊ शकते. पण पाच वर्षांनंतरही मूल सतत अंगठा चोखत असेल तर दातांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशी सवय सुटत नसेल तर दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मुलं सतत अंगठा चोखत राहिल्यामुळे दातांवर दबाव पडतो. त्यामुळे दातांची ठेवण बदलू शकते. काही मुलांचे वरचे दात पुढे येऊ शकतात.
सतत अंगठा तोंडात ठेवल्यामुळे वरचे आणि खालचे दात नीट एकमेकांवर येत नाहीत. त्यामुळे दातांमध्ये जागा राहू शकते. याचा परिणाम काही मुलांच्या बोलण्यावरही होऊ शकतो.
दातांची ठेवण बदलल्यामुळे अन्न नीट चावता येण्यास त्रास होऊ शकतो. वरचे आणि खालचे दात नीट जुळले नाहीत तर चावताना अडचण येऊ शकते. त्यामुळे मुलाची दातांची ठेवण बदलत आहे का, याकडे पालकांनी लक्ष द्यावं.
सतत अंगठा तोंडात ठेवल्यामुळे बोटाची त्वचा सतत ओलसर राहते. त्यामुळे बोटाची त्वचा लाल होणं किंवा खराब होणं असे त्रास होऊ शकतात. म्हणून मुलाची ही सवय हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा.
सर्वात आधी मुलं अंगठा का चोखतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुलं अंगठा तोंडात घालणार नाहीत यासाठी त्यांचं लक्ष खेळ, गोष्टी किंवा दुसऱ्या आवडीच्या कामाकडे वळवा. झोपताना अंगठा तोंडात असेल तर तो हळूच बाहेर काढा.