Surabhi Jayashree Jagdish
शरीरात वाढलेलं खराब कोलेस्ट्रॉल हृदयासाठी धोकादायक ठरतं. त्यामुळे अनेकजण नैसर्गिक उपायांकडे वळताना दिसतात. अशावेळी घरच्या घरी बनवलेलं हे पिवळं ड्रिंक शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.
हे ड्रिंक हळद, आलं, दालचिनी, काळी मिरी आणि लिंबू यांचं मिश्रण वापरून तयार केलं जातं. या सर्व घटकांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते.
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं नैसर्गिक घटक असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं. काही संशोधनांमध्ये कर्क्युमिनमुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळू शकतं असं सांगितलं गेलंय. हळद रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा वेग कमी करण्यासही मदत करू शकते.
एका ग्लास कोमट पाण्यासाठी अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी आणि थोडंसं किसलेलं आलं लागतं. त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळला जातो.
सर्वप्रथम पाणी हलकं कोमट करून घ्यावं आणि त्यात हळद व दालचिनी मिसळावी. त्यानंतर आलं आणि काळी मिरी घालून मिश्रण व्यवस्थित हलवावं. शेवटी लिंबाचा रस टाकून हे ड्रिंक ताजं असतानाच प्या.
हे ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास अधिक चांगला फायदा मिळू शकतो. काही लोक रात्री झोपण्यापूर्वीही हे ड्रिंक घेतात कारण त्यामुळे शरीर रिलॅक्स होण्यास मदत मिळते. मात्र दिवसातून एकदाच हे ड्रिंक घेणं योग्य मानलं जातं.
ज्यांना अॅसिडिटी, अल्सर किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी हे ड्रिंक पिताना सावधगिरी बाळगावी. शरीराला त्रास जाणवल्यास हे ड्रिंक घेणं बंद करून तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.