Surabhi Jayashree Jagdish
गुळखोबऱ्याचे गोड घावन हे खरं तर मोदकासारखंच चविष्ट लागतात, कारण यात मोदकातील सारण (खोबरं आणि गुळाचं) वापरलं जातं.
हे घावन कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवता येतात, आणि यांना मोदकाचीच चव येते.
तांदळाचे पीठ - १ कप, गूळ पावडर किंवा किसलेला गूळ - १/२ कप, मीठ - १ चिमूट, पाणी - गरजेनुसार, वेलची पूड - १/२ छोटा चमचा (ऐच्छिक), तूप किंवा तेल - घावन भाजण्यासाठी, खोवलेले ओले खोबरे - १/२ कप, गूळ पावडर किंवा किसलेला गूळ - १/४ कप (सारणासाठी वेगळा), वेलची पूड - १/४ छोटा चमचा
एका कढईत खोवलेले ओले खोबरे आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर गरम करा. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि खोबऱ्याच्या मिश्रणात एकजीव होईपर्यंत परता. मिश्रण जास्त शिजवू नका, नाहीतर ते कडक होईल.
एका मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ, मीठ, वेलची पूड (असल्यास) आणि गूळ पावडर एकत्र करा. त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ पातळ करून घ्या. घावनासाठी पीठ डोश्याच्या पिठासारखं पातळ असावं, पण जास्त नाही.
एक नॉन-स्टिक तवा गरम करा. तव्यावर थोडे तूप किंवा तेल लावून घ्या. एक डावभर पीठ घेऊन तव्यावर घाला आणि गोल पसरवा. घावन जाड बनवू नका, शक्य असल्यास पातळच पसरवा.
घावनावर झाकण ठेवून मंद आचेवर १-२ मिनिटे वाफवून घ्या. झाकण काढून घावन पलटा आणि दुसऱ्या बाजूनेही थोडे भाजून घ्या.
घावन भाजून झाल्यावर ते गरम असतानाच एका प्लेटमध्ये काढा. घावनाच्या अर्ध्या भागावर तयार केलेले गुळखोबऱ्याचं सारण पसरा. घावनाची दुसरी बाजू सारणावर दुमडा. यामुळे सारण आतमध्ये राहील. गरमागरम गुळखोबरेचे गोड घावन लगेच सर्व्ह करा.