Surabhi Jayashree Jagdish
हृदय निरोगी ठेवायचं असेल तर दीर्घकाळ बसून राहण्याची आणि शारीरिक हालचाल टाळण्याची सवय सोडणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी काही दिवसांची बेडरेस्टदेखील हृदयाच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकते.
नियमित व्यायाम न केल्यास हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. परिणामी रक्त पंप करण्याची क्षमता घटते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कालांतराने वाढण्याची शक्यता असते.
मध्यम वयानंतर व्यायामाचा अभाव असल्यास हृदयाचा स्नायूंवर अधिक परिणाम होतो. त्यामुळे शरीराच्या गरजेनुसार हृदयाला वेगाने आणि प्रभावीपणे रक्त पंप करणं कठीण होतं. यामुळे विश्रांतीच्या अवस्थेतही हृदयाचे ठोके तुलनेने जास्त राहू शकतात.
दररोज सुमारे 30 ते 45 मिनिटं व्यायाम केल्याने शरीरात नायट्रिक ऑक्साइडचं उत्पादन वाढतं. यामुळे धमन्यांचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. निष्क्रिय राहिल्यास धमन्या कडक होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.
नियमित व्यायामामुळे संपूर्ण शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना ऑक्सिजन अधिक प्रभावीपणे मिळतो. त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येत नाही आणि त्याला कमी मेहनतीत अधिक काम करता येतं.
नियमित व्यायामामुळे ताण निर्माण करणारे हार्मोन्स कमी होण्यास मदत होते तसंच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास हातभार लागतो. याशिवाय चांगलं HDL कोलेस्ट्रॉल वाढण्यास आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.
हृदयाच्या आरोग्यासाठी वेगाने चालणं, सायकलिंग, पोहणं आणि नृत्य यांसारखं एरोबिक व्यायाम उपयुक्त मानले जातात. यासोबत आठवड्यातून किमान दोन दिवस योगा करावा. तज्ज्ञांच्या मते, आठवड्याला किमान 150 मिनिटं कार्डिओ व्यायाम करणं हृदयासाठी फायदेशीर आहे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.