Surabhi Jayashree Jagdish
19 एप्रिलला अक्षय्य तृतीया असून हिंदू धर्मात हा सण अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. असे मानलं जातं की, या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं चांगलं फळ मिळतं.
या दिवशी पूजा, दान आणि खरेदीला विशेष महत्त्व असतं. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस १९ एप्रिल रोजी सकाळी १०:४८ वाजता सुरू होईल आणि २० एप्रिल रोजी सकाळी ७:२७ वाजता संपणार आहे.
या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना शुद्ध जल अर्पण करावं. यानंतर, भगवान विष्णूला पिवळ्या चंदनाचा टिळा आणि देवी लक्ष्मीला कुंकू लावावं. तसंच लाल वस्त्रं व फुलं अर्पण करावीत.
विधीवत पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. लोक या प्रसंगी दागिने, नाणी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करतात.
पिवळ्या वस्तू खरेदी करणे विशेषतः फलदायी ठरतं. पिवळ्या कवड्या, मोहरी, धार्मिक पुस्तकं, फर्निचर आणि नवीन कपडे खरेदी करणं शुभ मानलं जातं.
मात्र या दिवशी ॲल्युमिनियम, स्टील आणि प्लास्टिकची भांडी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. असं केल्यास देवी नाराज होऊन तुम्हाला आशिर्वाद देत नाही.