Surabhi Jayashree Jagdish
सध्याच्या डिजिटल युगात झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणं ही अनेकांची सवय बनलीये. मात्र ही सवय मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते असा इशारा डॉक्टर आणि झोपतज्ज्ञ देत आहेत.
चांगली झोप ही केवळ विश्रांतीसाठी नसून स्मरणशक्ती, भावनिक संतुलन आणि मेंदूच्या दुरुस्तीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे झोपेवर परिणाम करणाऱ्या काही सवयी दीर्घकाळात मेंदूची कार्यक्षमता कमी करू शकतात.
मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप आणि टीव्हीमधून निघणारा निळा प्रकाश मेंदूमधील मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो. त्यामुळे शरीराला झोपेचा नैसर्गिक संकेत उशिरा मिळतो आणि झोप येण्यास विलंब होतो.
सोशल मीडिया, व्हिडिओ आणि सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे मेंदू सतर्क अवस्थेत राहतो. झोपेपूर्वी मेंदू शांत होण्याऐवजी अधिक उत्तेजित होतो आणि विश्रांती घेण्यास अडचण निर्माण होते. परिणामी गाढ झोप कमी मिळते.
गाढ झोपेमध्ये मेंदू स्मरणशक्ती मजबूत करणं आणि पेशींची दुरुस्ती करणं यांसारखी महत्त्वाची कामं करतो. झोप वारंवार खंडित झाल्यास ही प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होतोय. त्यामुळे मेंदूला पूर्णपणे विश्रांती मिळत नाही आणि मानसिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
अनेक लोक सात-आठ तास बिछान्यावर घालवतात पण झोपेची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे मेंदूला अपेक्षित फायदा मिळत नाही. अशा परिस्थितीत दिवसभर एकाग्रता कमी होणं, चिडचिड वाढणं आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं यांसारख्या समस्या दिसू शकतात.
संशोधनानुसार दीर्घकाळ खराब झोपेमुळे स्मरणशक्ती कमी होणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं आणि मानसिक थकवा वाढणं यांसारखे परिणाम दिसू शकतात. याशिवाय तणावाची पातळी वाढून भावनिक संतुलन बिघडण्याचा धोका असतो.