Surabhi Jayashree Jagdish
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेहाचा धोका वाढतोय. दैनंदिन काही सवयी नकळत रक्तातील साखरेची पातळी बिघडवू शकतात. या सवयी वेळेत ओळखून त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे.
दिवसभर एकाच जागी बसून राहिल्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. यामुळे शरीर इन्सुलिनचा प्रभावी वापर करू शकत नाही आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. नियमित चालणे, व्यायाम करणं या गोष्टी मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
सकाळचा नाश्ता न केल्यास दिवसभर रक्तातील साखरेची पातळी अस्थिर राहू शकते. यामुळे नंतरच्या वेळी जास्त भूक लागते आणि गरजेपेक्षा अधिक खाण्याची शक्यता वाढते. सतत अशी सवय राहिल्यास वजन वाढू शकते आणि मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो.
साखरयुक्त पेयं, मिठाई, पॅकेज्ड स्नॅक्स आणि पेस्ट्री यांचं वारंवार सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. अशा पदार्थांमुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात आणि वजन वाढण्यास मदत होते. वाढलेले वजन आणि सतत वाढणारी रक्तातील साखर ही मधुमेहाची प्रमुख कारणं मानली जातात.
कमी झोपेमुळे भूक नियंत्रित करणाऱ्या आणि रक्तातील साखरेचं नियमन करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. यामुळे शरीराची ग्लुकोज प्रक्रिया करण्याची क्षमता कमी होऊ शकते. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यास शरीरात कॉर्टिसोल या हार्मोनची पातळी वाढते. कॉर्टिसोल वाढल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं आणि चयापचय प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास अनेकजण तहान भागवण्यासाठी साखरयुक्त पेयं पितात. कमी पाणी प्यायल्यामुळे शरीर ग्लुकोजचं संतुलन राखण्यात कमी प्रभावी ठरू शकतं.