Surabhi Jayashree Jagdish
किडनी आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. जगभरात किडनीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. उपचारांवर मोठा खर्च होत असतानाच या आजारामुळे लोकांच्या आयुष्यावरही गंभीर परिणाम होतात.
किडनीच्या आजारांची लक्षणं वेळेवर ओळखली जात नाहीत, ही सर्वात मोठी समस्या आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे किडनीचं नुकसान अधिक वाढतं. काही खाद्यपदार्थ आणि पेयं अशी आहेत जी किडनीसाठी धोकादायक ठरू शकतात.
सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा आणि एनर्जी ड्रिंक्सचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. मात्र या पेयांमध्ये साखर आणि कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं. संशोधनानुसार, अशा पेयांमुळे वजन वाढण्याची आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
तरुणांमध्ये मद्यपानाचं प्रमाण वाढताना दिसतंय. मात्र जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन केल्यास किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, मद्यपानामुळे किडनीचं कार्य बिघडण्याचा धोका वाढतो.
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण रेडीमेड आणि प्रोसेस्ड फूडवर अवलंबून राहू लागले आहेत. मात्र या पदार्थांमध्ये सोडियम, फॉस्फरस आणि अनहेल्दी फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. किडनीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी हे पदार्थ अधिक धोकादायक ठरू शकतात.
डबाबंद पदार्थांचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा पदार्थांमध्ये सोडियम आणि प्रिझर्व्हेटिव्ह्सचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे किडनीच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
भारतीय स्वयंपाकात टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक पदार्थात केला जातो. मात्र जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्यास काही लोकांमध्ये किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. कारण टोमॅटोमध्ये ऑक्सलेट आणि कॅल्शियमचं प्रमाण असतं.
होल व्हीट ब्रेडला आरोग्यासाठी चांगला पर्याय मानलं जातं. नाश्त्यामध्ये अनेकजण याचा नियमित वापर करतात. मात्र या ब्रेडमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण पांढऱ्या ब्रेडपेक्षा अधिक असतं. त्यामुळे किडनीच्या रुग्णांसाठी ते नेहमीच योग्य ठरेल असं नाही.