Surabhi Jayashree Jagdish
व्हिटॅमिन B12 हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्त्व असून ते मेंदू, मज्जासंस्था आणि रक्तनिर्मितीसाठी आवश्यक असतं. हे दूध, अंडी, मासे, मांस या पदार्थांमधून मिळतं. शरीरात त्याची कमतरता झाल्यास नसांचं नुकसान होण्यास सुरुवात होऊ शकते.
पूर्णपणे शाकाहारी किंवा व्हिगन डाएट घेतल्यास व्हिटॅमिन B12 चं प्रमाण अपुरं पडू शकते. अशा व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याने फोर्टिफाइड अन्नपदार्थ किंवा सप्लिमेंट्सची गरज लागू शकते.
पोटातील Intrinsic Factor या प्रोटीनची कमतरता, पोट किंवा आतड्यांचे काही आजार आणि काही शस्त्रक्रियांमुळे B12 ची कमतरता होऊ शकते. अशा परिस्थितीत आहार चांगला असूनही शरीरात B12 ची कमतरता निर्माण होऊ शकते. याची हातांमध्ये कोणती लक्षणं दिसतात ते पाहूयात.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास हातांच्या बोटांमध्ये मुंग्या येणं किंवा सुन्नपणा जाणवू शकतो. हे नसांवरील परिणामामुळे होत असून सुरुवातीचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. वेळेवर उपचार न घेतल्यास ही समस्या वाढू शकते.
हातांच्या तळव्यांमध्ये किंवा बोटांमध्ये जळजळ, झिणझिण्या किंवा सुई टोचल्यासारखं वाटू शकतं. ही लक्षणं नसांच्या कार्यात बिघाड झाल्याचे संकेत असू शकतात. अशी तक्रार वारंवार होत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास हातांच्या स्नायूंवर आणि मज्जातंतूंवर परिणाम होऊन पकड कमी होऊ शकते. वस्तू हातातून निसटणं किंवा शर्टाचं बटण लावणं, लिहिणं अशी साधी कामं करताना अडचण येऊ शकतं.
व्हिटॅमिन B12 च्या दीर्घकालीन कमतरतेमुळे हातांच्या हालचालींमध्ये बिघाड जाणवू शकतो. लहान वस्तू उचलताना अडचण येणं किंवा हात थरथरण्याचा त्रास रूग्णाला होऊ शकतो.