Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅक ही समस्या झपाट्याने वाढताना दिसतेय. कमी वयातही अनेकांना अचानक हृदयविकाराचा झटका येत असल्याच्या घटना समोर येतात. डॉक्टरांच्या मते, काही सवयी आणि आरोग्याशी संबंधित समस्या या हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीमध्ये अचानक अडथळा निर्माण झाला की हार्ट अटॅक येतो. हा अडथळा रक्ताच्या गाठीमुळे तयार होतो. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
शरीरातील वाईट म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल अनेक वर्षे हळूहळू रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये साचत राहतं. यामुळे प्लाक तयार होतो. हा प्लाक फुटल्यास रक्ताची गाठ तयार होऊन रक्तवाहिनी पूर्णपणे ब्लॉक होऊ शकते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हाय ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांवर सतत दबाव येतो. त्यामुळे त्या कडक आणि कमकुवत होतात. हृदयालाही अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे प्लाक तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते. मीठाचं प्रमाण कमी ठेवणं, नियमित चालणं, व्यायाम करणं आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात.
रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त राहिल्यास रक्तवाहिन्यांच्या आतील भागाचं नुकसान होतं. त्यामुळे प्लाक लवकर तयार होतो. मधुमेहासोबत उच्च रक्तदाब, वाढलेले ट्रायग्लिसराइड्स आणि कमी HDL अशी समस्या असली तर धोका आणखी वाढतो.
सिगारेट आणि तंबाखूमधील घातक रसायनांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण होते. रक्त अधिक चिकट होतं आणि गाठी तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका खूप वाढतो.
डॉक्टरांच्या मते, हार्ट अटॅक अचानक येत असला तरी त्यामागची कारणं अनेक वर्षांपासून शरीरात तयार होत असतात. त्यामुळे नियमित तपासणी, संतुलित जीवनशैली आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहणं गरजेचं आहे.