Surabhi Jayashree Jagdish
उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे केवळ आहारच नाही, तर सकाळच्या काही सवयीदेखील कारणीभूत ठरू शकतात. झोपेतून उठल्यानंतर शरीरात रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढत असतो, त्यामुळे हा काळ हृदयासाठी संवेदनशील मानला जातो. या सवयी कोणत्या आहेत ते पाहूयात.
खूप स्ट्राँग किंवा जास्त कॅफिन असलेली कॉफी काही लोकांमध्ये रक्तदाब तात्पुरता वाढवू शकते. कॅफिनमुळे हृदयाचे ठोके वेगाने पडण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कॅफिनचं सेवन मर्यादित ठेवणं फायदेशीर आहे.
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि रक्तदाब वाढतो. निकोटीनमुळे हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. ही सवय कोलेस्ट्रॉलशी संबंधित हार्ट अटॅकचा धोकाही वाढवू शकते.
तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात. अशा पदार्थांमधील ट्रान्स फॅट्स चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्याचे काम करतात. तसेच जास्त मीठ असलेले पदार्थ रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
झोपेतून उठल्यानंतर शरीरात रक्तदाब आणि हार्ट रेट वाढण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. शरीराला दिवसभराच्या कामांसाठी तयार करण्यासाठी हा बदल घडतो. मात्र उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांसाठी हा काळ अधिक जोखमीचा असू शकतो.
अनेकदा रक्तदाब वाढलेला असला तरी कोणतीही स्पष्ट लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे अनेक लोकांना समस्या गंभीर होईपर्यंत त्याची माहिती मिळत नाही. याच कारणामुळे रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते.
एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचू लागते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.