Surabhi Jayashree Jagdish
हृदयाच्या रक्तवाहिन्यांना सूज आल्यास शरीरात अनेक बदल दिसू शकतात. ही सूज रक्तप्रवाहावर परिणाम करू शकते आणि त्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्याचा परिणाम पायांमध्येही विविध लक्षणांच्या स्वरूपात दिसून येऊ शकतो.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतील थरात दाह किंवा जळजळ निर्माण होण्याला रक्तवाहिन्यांची सूज असे म्हणतात. या सूजेमुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात किंवा त्यांचे कार्य बिघडू शकते.
उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा ही रक्तवाहिन्यांच्या सूजे येण्याची प्रमुख कारणं आहेत. काही वेळा संसर्ग किंवा ऑटोइम्यून आजारांमुळेही रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण होऊ शकते.
हृदयाचं कार्य कमी झाल्यास शरीरातील द्रवपदार्थ पायांमध्ये साचू लागतो आणि घोटे तसंच पाय सुजतात. ही सूज संध्याकाळच्या वेळी किंवा जास्त वेळ उभे राहिल्यानंतर अधिक जाणवू शकते. बूट किंवा चप्पल घट्ट वाटणं हे देखील या सूजेचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
रक्तप्रवाह योग्य न झाल्यामुळे पाय जड वाटू शकतात आणि चालताना लवकर थकवा जाणवू शकतो. थोडं अंतर चालल्यानंतरही पायांमध्ये अशक्तपणा किंवा दमल्यासारखे वाटू शकते. ही लक्षणं सतत जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
रक्तपुरवठा कमी झाल्यास पायांमध्ये वेदना, मुंग्या येणं किंवा थंडपणा जाणवू शकतो. काही लोकांना चालताना पोटऱ्यांमध्ये वेदना जाणवते आणि विश्रांती घेतल्यावर ती कमी होतं. ही लक्षणं रक्ताभिसरणात अडथळा निर्माण झाल्याचे संकेत असू शकतात.
पायांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास त्वचेचा रंग फिकट, निळसर किंवा काळसर दिसू शकतो. पायावर झालेल्या छोट्या जखमाही भरून येण्यास जास्त वेळ लागू शकतो. अशी लक्षणं दिसल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यांची तपासणी करून योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.