Surabhi Jayashree Jagdish
हृदय शरीराच्या प्रत्येक भागात रक्त पोहोचवण्याचं काम करतं आणि पायांपर्यंतही सतत रक्तप्रवाह सुरू असतो. रक्ताभिसरणात अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शरीराच्या टोकाच्या भागांमध्ये म्हणजेच पायांमध्येही जाणवू शकतो.
पायांकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या किंवा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला तर स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात अडचण येऊ शकते. यामुळे हार्ट अटॅक येण्याच्या 15 दिवस अगोदर पायांमध्ये वेदना, क्रॅम्प्स, थंडपणा किंवा त्वचेच्या रंगात बदल यांसारखी लक्षणं जाणवू शकतात.
डॉ. रॉबर्ट वेन्स यांच्या सांगण्यानुसार, दररोज १० ते १५ मिनिटं हलकं चालल्याने पायांचे स्नायू एक्टिव्ह राहतात आणि रक्ताला पायांमधून वरच्या दिशेने जाण्यास मदत होते. दीर्घकाळ एकाच जागी बसून राहण्यापेक्षा दिवसभरात नियमित हलकी हालचाल ठेवणे फायदेशीर ठरते.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं तुमच्या पायांमध्ये दिसून येतात. ही लक्षणं कोणती आहेत ते पाहूयात.
दररोज संध्याकाळी दोन्ही घोटे, पाय किंवा पोटऱ्यांमध्ये सूज येत असेल, तर हे लक्षण दुर्लक्षित करू नये. हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यास शरीराच्या खालच्या भागात द्रव साचू शकतो आणि त्यामुळे पायांमध्ये सूज दिसू शकते.
रात्री झोपताना किंवा विश्रांती घेत असताना पोटरीच्या स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येत असतील तर त्याकडे लक्ष द्या. पायांकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास स्नायूंना पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तप्रवाह न मिळाल्याने पायांमध्ये वेदना किंवा क्रॅम्प्स जाणवू शकतात.
पाय किंवा पायाची बोटं सतत थंड वाटणं, बधिरपणा जाणवणं किंवा त्वचेचा रंग फिकट, निळसर किंवा लालसर होणं हे रक्तप्रवाह कमी झाल्याचे संकेत असू शकतात. रक्त पायांच्या टोकापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्यास अशा प्रकारचे बदल दिसू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.