Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्यात बहुतेक लोक रोज कारच्या एसीचा वापर करतात. मात्र डॅशबोर्डवर असलेल्या एका छोट्या बटणाकडे अनेकांचं लक्ष जात नाही. या बटणावर कारच्या आत गोलाकार फिरणाऱ्या बाणाचं चिन्ह असतं. या बटणामुळे कार लवकर थंड होण्यास आणि एसीवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
कारमधील या बटणाला 'एअर रिसर्क्युलेशन बटण' (Air Recirculation Button) असं म्हणतात. हे बटण सुरू केल्यावर एसी बाहेरची हवा आत घेण्याऐवजी कारमधील हवेचा पुन्हा वापर करतो. केबिनमधील हवा एसीच्या यंत्रणेतून पुन्हा थंड केली जाते. त्यानंतर हीच हवा कारच्या आत फिरत राहते.
रिसर्क्युलेशन मोड सुरू केल्यावर बाहेरची गरम हवा आत येण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे एसीला बाहेरून येणारी गरम हवा सतत थंड करण्याऐवजी केबिनमधील हवेवर काम करता येते. केबिनमधील हवा आधीच काही प्रमाणात थंड झालेली असल्याने ती आणखी थंड करणं सोपं होतं.
अनेकांना वाटतं की, कारचा एसी थंड हवा तयार करतो, पण प्रत्यक्षात तो हवेतील उष्णता बाहेर काढून हवा थंड करतो. सामान्य मोडमध्ये एसी बाहेरून येणारी गरम हवा थंड करण्याचं काम करतो.
कारचा एसी सुरू असताना त्याचा कॉम्प्रेसर काही प्रमाणात इंजिनची शक्ती वापरतो. एसीला जास्त काम करावं लागल्यास इंधनाचा वापर वाढू शकतो. रिसर्क्युलेशन मोडमध्ये केबिनमधील हवा हळूहळू थंड होत असल्याने एसीवरील कामाचा ताण कमी होऊ शकतो.
उन्हात बराच वेळ उभी असलेली कार लवकर थंड करण्यासाठी रिसर्क्युलेशन मोड उपयोगी ठरतो. कारमध्ये बसल्यानंतर एसी सुरू करून हा मोड वापरल्यास केबिनमधील हवा लवकर थंड होण्यास मदत होते.
कारमध्ये अनेक लोक बसले असतील आणि बराच वेळ बाहेरची ताजी हवा आत येत नसेल, तर केबिनमधील हवा कोंदट वाटू शकते. अशा वेळी कारमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे गरजेनुसार रिसर्क्युलेशन मोड बंद करून बाहेरची ताजी हवा आत येऊ द्यावी.