Surabhi Jayashree Jagdish
पुरुषांच्या अंडकोषामध्ये शुक्राणू आणि टेस्टोस्टेरॉन तयार करणाऱ्या पेशी असतात. या पेशींमध्ये असामान्य आणि अनियंत्रित वाढ सुरू झाली तर ट्यूमर तयार होऊ शकतो, ज्याला अंडकोषाचा (Testicular) कॅन्सर म्हणतात. हा आजार बहुतेक वेळा एका अंडकोषापासून सुरू होतो.
अंडकोषामध्ये वेदना न होता जाणवणारी गाठ हे या कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. गाठ लहान असली तरी ती दुर्लक्षित करू नये कारण सुरुवातीच्या अवस्थेत कॅन्सरची इतर लक्षणं स्पष्टपणे दिसतीलच असं नाही.
अंडकोषामध्ये सूज येणं हेही संभाव्य लक्षण असू शकतं. काही पुरुषांना अंडकोष किंवा मांडीच्या सांध्याजवळ तसंच पोटाच्या खालच्या भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. अंडकोषात अचानक द्रव साचणं अशी लक्षणंही काही रुग्णांमध्ये दिसू शकतात.
अंडकोषाचा कॅन्सर नेमका कोणत्या एका कारणामुळे होतो हे स्पष्ट झालेलं नाही. पण जन्माच्या वेळी एक किंवा दोन्ही अंडकोष त्यांच्या नेहमीच्या जागी नसतात म्हणजेच क्रिप्टोर्किडिझम. या कॅन्सरचं हे एक कारण मानलं जातं.
अंडकोषाचा कॅन्सर इतर अनेक कॅन्सरच्या तुलनेत तरुण पुरुषांमध्ये अधिक आढळतो. किशोरवयीन आणि तरुण प्रौढ पुरुषांमध्ये या आजाराचं प्रमाण पाहायला मिळतो. त्यामुळे या वयोगटाने शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करू नये.
डॉक्टर सुरुवातीला शारीरिक तपासणी करून अंडकोषातील गाठीचा आकार आणि स्वरूप तपासतात. त्यानंतर अंडकोषाचा अल्ट्रासाऊंड करून गाठ अंडकोषाच्या आत आहे की बाहेरील भागात याची माहिती मिळवली जाते.
अंडकोषाचा कॅन्सर कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या टप्प्यावर आढळला आहे, यानुसार उपचार ठरवले जातात. प्रभावित अंडकोष काढण्याची शस्त्रक्रिया हा उपचाराचा महत्त्वाचा भाग असून काही रुग्णांना त्यानंतर केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीची आवश्यकता भासू शकते.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.